Ajit Pawar : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आगाऊ नोव्हेंबरचे मिळून ३ हजार लाडक्या बहिणींना मिळणार
बीडला विमानतळ करण्यात येईल, त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढतील व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल', असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील, तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांनी केली. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहिणी व नागरिकांच्या संवाद सभेत अजित पवार बोलत होते.
याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार विक्रम काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना’ आम्ही सुरू केल्याने विरोधकांना मळमळ होत आहे. परंतु आम्ही ही योजना यापुढे चालूच ठेवणार आहे. भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकरी, शेतमजुरांच्या हितासाठी, महिला-मुलींसाठी, होमगार्डसाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढेही विकासासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. बीडला विमानतळ करण्यात येईल, त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढतील व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल’, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.