Lionel Messi : लायनेल मेस्सीने जादूई फ्री किकने मोडला डेव्हिड बेकहमचा विक्रम

67
Lionel Messi : लायनेल मेस्सीने जादूई फ्री किकने मोडला डेव्हिड बेकहमचा विक्रम 
Lionel Messi : लायनेल मेस्सीने जादूई फ्री किकने मोडला डेव्हिड बेकहमचा विक्रम 
  • ऋजुता लुकतुके 

फुटबॉलमध्ये सध्या लायनेल मेस्सीची (Lionel Messi) पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. इंटर मियामी संघाला त्याने अमेरिकेतील मेजर सॉकर लीग जिंकून देताना मेस्सीने दोन गोल केले. यातील फ्री किकवर त्याने केलेला गोल हा जादूई होता. हा गोल चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर चाहत्यांनी ‘अविश्वसनीय’ अशी प्रतिक्रियाही दिली आहे. त्याचबरोबर मेस्सीने कारकीर्दीतला तब्बल ४६ वा चषक जिंकला आहे. तर फ्री किकवरील गोलने त्याने डेव्हिड बेकहमलाही मागे टाकलं आहे.

(हेही वाचा- Rahul Shewale: केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर राहुल शेवाळे म्हणाले, ‘अजी सोनियाचा दिनु…!’)

या सगळ्यामुळेच लायनेल मेस्सी सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होत आहे. मेस्सीच्या इंटर मियामी क्लबने कोलंबस क्रूचा ३-२ असा पराभव केला. मियामीसाठी उर्वरित गोल लुईस सॉरेझने केला. पण, चषक विजेता क्षण ८४ व्या मिनिटाला आला. कारण, त्यावेळी गोलीने संघासाठी चक्क एक पेनल्टी वाचवली. त्यातूनच मियामीचा विजय पक्का झाला. मेस्सीने २०२३ मध्ये इंटर मियामी क्लबशी करार केला. त्यानंतर त्याच्या क्लबने जिंकलेला हा दुसरा चषक आहे. २०२३ मध्येच क्लबने लीग जिंकली होती. (Lionel Messi)

अंतिम सामन्यात मेस्सीचा फ्री किकवरील गोल विशेष लक्षवेधी ठरला.

फ्री किकवरील हा गोल अत्यंत देखणा होता. समोर उभ्या असलेल्या ६ खेळाडूंची फळी भेदत त्यांच्या बाजूने त्याने चेंडू वक्राकार फिरवला. गोलजाळ्याच्या कोपऱ्यात चेंडू भिरकावत त्याने गोलीला बेमालून बनवलं. हा मेस्सीचा फ्री किकवर केलेला ६६ वा गोल होता. यात त्याने डेव्हिड बेकहमलाही मागे टाकलं आहे. आपल्या काळात बेकहम हा फ्री किकसाठी प्रसिद्ध होता. विशेष म्हणजे सध्या डेव्हिड बेकहम इंटर मियामी क्लबमधील एक भागिदार आहे. मेस्सीला मियामी क्लबमध्ये आणण्यात त्याची मोठी भूमिका आहे. (Lionel Messi)

मेस्सीचं हे ४६ वं विजेतेपद होतं. अर्जेंटिनासाठी त्याने जिंकलेला विश्वचषक आणि दोन कोपा अमेरिका विजेतेपदांचाही समावेश आहे. त्यानंतर त्याने बार्सिलोनाकडून सर्वाधिक म्हणजे ३५ विजेतेपदं पटकावली आहेत. यात १० वेळा त्याने लालिगा विजेतेपद पटकावलं आहे. तर युएफा चॅम्पियन्स लीगही चारवेळा जिंकली आहे. मेस्सीने त्याच्या घरी एका कोनाड्यात एक मोठं कॅबिनेट केलं आहे. तिथे मिळवलेल्या सर्व विजेतेपदांच्या प्रतिकृती ठेवल्या आहेत. फावल्या वेळेत आणि ऊर्जा मिळवण्यासाठी अनेकदा तो या कोपऱ्यात शांतपणे बसून राहतो, असं त्यानेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.  (Lionel Messi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.