-
ऋजुता लुकतुके
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी टी उषा (P. T. Usha) यांनी येत्या २५ ऑक्टोबरला कार्यकारिणीची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. यात असोसिएशन समोरच्या काही महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा होणार आहे. आधीची असोसिएशनची बैठक वादळी ठरली होती. खासकरून मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यावरून पी टी उषा आणि १० कार्यकारिणी सदस्यांमध्ये धुम:चक्री झाली होती. तोच आताच्या बैठकीचाही मुख्य मुद्दा असेल.
(हेही वाचा- Lionel Messi : लायनेल मेस्सीने जादूई फ्री किकने मोडला डेव्हिड बेकहमचा विक्रम)
रघुराम अय्यर (Raghuram Iyer) यांची सीईओ म्हणून नियुक्ती, सहदेव यादव (Sahdev Yadav) यांच्या विरोधातील लाचखोरीचे आरोप आणि कार्यकारिणीच्या काही सदस्यांवर असलेले अपात्रतेचे आरोप असे ज्वलंत मुद्दे या बैठकीत चर्चेला येतील. या सगळ्याच मुद्यांवर उषा यांचे इतर काही सदस्यांशी खटके उडाले आहेत. त्यामुळे आधीच्या बैठकीपेक्षाही आताची बैठक वादळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासकरून रघुराम अय्यर यांच्या नेमणुकीला १० सदस्यांनी विरोध केला आहे. त्यांना देण्यात आलेला पगार आणि पात्रता हा विरोधाचा मुद्दा आहे. तर एकदा प्रक्रिया पार पडलेली असताना ती पुन्हा का फिरवायची असा मुद्दा उषा यांनी उपस्थित केला आहे. सीईओची नियुक्ती वेळेत झाली नाही तर भारताच्या ऑलिम्पिक आयोजनाच्या प्रयत्नांनाही धक्का लागू शकतो. (P. T. Usha)
आगामी विशेष सभेत रघुराम अय्यर यांच्या नियुक्तीवर मतदान घेण्याचा उषा यांचा इरादा आहे. रघुराम अय्यर यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीचे सीईओ म्हणून काम पाहिलं आहे. इंडियन सुपर लीग आणि अल्टिमेट टेबलटेनिस या लीगचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. याशिवाय सहदेव यादव हे ऑलम्पिक असोसिएशनचे खजिनदार आहेत. आणि नुकतीच उषा यांनी त्यांच्यावरील आरोपांवरून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे भडकलेल्या यादव यांनी उषा यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याची भाषा केली होती. (P. T. Usha)
ऑलिम्पिक असोसिएनच्या कार्यकारी समितीत सध्या उपाध्यक्ष अजय पटेल, राजलक्ष्मी देव, गगन नारंग तर खजिनदार सहदेब यादव, सहसचिव अलकनंदा अलोक हे पदाधिकारी आहेत. तर योगेश्वर दत्त, डोला बॅनर्जी, रोहीत राजपाल, अमिताभ शर्मा, भुपेंदरसिंग बाजवा आणि डोला बॅनर्जी हे सदस्य आहेत. (P. T. Usha)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community