Housing Prices in Mumbai : सणाच्या दिवसांत मुंबईतील घरांच्या किमती घटल्या, घर खरेदीची चांगली संधी?

Housing Prices in Mumbai : सप्टेंबर महिन्यात घरांची मागणी आणि विक्री ११ टक्क्यांनी घटली आहे. 

137
Housing Prices in Mumbai : सणाच्या दिवसांत मुंबईतील घरांच्या किमती घटल्या, घर खरेदीची चांगली संधी?
  • ऋजुता लुकतुके

भारतात नवरात्रीपासून ते नवीन वर्ष सुरू होईपर्यंत सणासुदीचा हंगाम असतो. त्या काळात नवीन कपड्यांपासून ते अगदी सोने-चांदी आणि नवीन गुंतवणुकीसाठीही हा काळ शुभ मानला जातो. बाकी सगळीकडे सध्या महागाई आहे. पण, घर खरेदीसाठी दसऱ्यापासूनचा काळ तुम्हाला लाभदायी ठरू शकतो. देशातील प्रमुख शहरात आणि खासकरून मुंबईत आता काही नवीन गृह प्रकल्पांच्या जाहिरातीही सुरू झाल्या आहेत. तर अनेकांची दसरा-दिवाळीला नवीन घरात जाण्याची झुंबड उडाली आहे.

याचं कारण म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतातील प्रमुख सात शहरांमध्ये घरांची मागणी गेल्यावर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे अर्थातच, घरांच्या किमतीही आटोक्यात आल्या आहेत. अशावेळी घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. देशातील सात महत्त्वाच्या शहरांमध्ये घर खरेदीच्या व्यवहारांमध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. खरंतर या कालावधीत गणेशोत्सव होता. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात या कालावधीत एरवी घर खरेदीचा उत्साह वाढलेला असतो. पण, यंदा तो आधीच्या तुलनेत थंडावलेला दिसला. गेल्यावर्षी याच कालावधीत १.१२ लाख घरांची विक्री झाली होती. तोच आकडा यंदा १.०७ लाखांवर आला आहे. (Housing Prices in Mumbai)

(हेही वाचा – Crime : व्यसनमुक्ती केंद्र बनले छळ केंद्र, कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एका रुग्णाचा मृत्यू)

ॲनारॉक या बांधकाम क्षेत्रात संशोधन करणाऱ्या कंपनीने याविषयीचा एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, २०२३ मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १.२० लाख घरांची विक्री झाली होती. तो आकडा आता १.०७ लाखांवर आला आहे. मागच्या दोन वर्षांत या सात शहरांमध्ये घरांच्या किमतीत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच घरांची मागणी कमी झाल्याचा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे. त्याचबरोबर पावसाची अनियमितता हे आणखी एक कारण बांधकाम व्यावसायिकांनी पुढे केलं आहे. मुंबईसारख्या शहरांत गेल्या ३ महिन्यांत ३६,१९० घरांची विक्री झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही विक्री १३ टक्क्यांनी कमी आहे.

अशावेळी बांधकाम व्यावसायिकांनी नवीन घरांवर सवलती देऊ केल्यामुळे दिवाळीला नवीन घरांची चांगली संधी मध्यमवर्गीयांना मिळू शकेल. ‘सध्या लोकांची घर खरेदीसाठी सावध भूमिकाच घेतली आहे. कारण, गेल्या दोन वर्षांत घरांच्या किमती वाढलेल्या होत्या. त्यातच पावसाळा नुकताच संपलाय. पावसातही लोक फारसे घर खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. पण, आता दसऱ्यापासून हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे,’ असं रोहीत गोखले या बांधकाम क्षेत्रातील तज्ञांनी सांगितलं. (Housing Prices in Mumbai)

(हेही वाचा – Hockey League : हॉकी इंडिया लीगच्या पुनरुज्जीवनासाठी हॉकी इंडिया करणार ३,६४० कोटी रुपये खर्च)

पण, नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी आहे का? ‘किमती कमी होण्याची शक्यता आहे. पण, पूर्णपणे उतरलेल्या नाहीत. आगामी काळही अनिश्चिततेचा आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मी सावधानतेचाच सल्ला देईन. पण, ज्यांना राहण्यासाठी घर घ्यायचं आहे त्यांनी सध्या मिळणाऱ्या सवलती आणि शुभ दिवसांचा नक्कीच फायदा करून घ्यावा,’ असं गोखले म्हणाले. म्हाडानेही लॉटरीमध्ये विकली न गेलेली घरं लॉटरीच्या बाहेर कमी किमतीत विक्रीला काढली आहेत. (Housing Prices in Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.