BMC : ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ मुंबईत कुठे दिसलीच नाही!

91
BMC : ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ मुंबईत कुठे दिसलीच नाही!
BMC : ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ मुंबईत कुठे दिसलीच नाही!
  • सचिन धानजी

केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर  २०२४ या कालावधीत स्वच्छता या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबवण्यात आली. पण यातील शनिवारी एकाच दिवशी काय ती स्वच्छता दिसली. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये २१ सप्टेंबर रोजी हे अभियान राबवले गेले. पण त्या व्यतिरिक्त मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) किंवा अन्य प्राधिकरण, संस्था, खासगी स्वयंसेवी संस्था आदींच्यावतीने कुठेही ही स्वच्छता मोहीम राबवली गेल्याचे दिसले नाही आणि स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता दिसली नाही. मुळात यावेळची संकल्पना हीच स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता यावर आधारीत होती. अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव बदलणे, त्यांच्यावर संस्कार करणे हेच यातून अभिप्रेत होते. पण या पंधरवड्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तेही करता आले नाही. मग कशाला असे पंधरवडे साजरे करायचे.

मुंबईत स्वच्छता राखणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य असते आणि आपल्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी तसेच खासगी संस्थांच्या माध्यमातून ते मुंबई स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु या अशा पंधरवड्यात खासगी स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था तसेच नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी हाती झाडू घेणे आवश्यक असते. अशा पंधरवड्यात महापालिकेच्या कामगारांनी मोहिमेत भाग घेणे अपेक्षित नसते. परंतु आपल्याकडे नेहमीच उलटी गंगा वाहत असते. महापालिकेचे सफाई कामगार तर नेहमीच काम करत असतात. अपेक्षा असते ती नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेत त्यांना अस्वच्छता न करण्याबाबत, कचरा इतरत्र न फेकण्याबाबत तसेच आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ राखण्याची दक्षता घेण्याबाबत त्यांना स्वत:ला याचे महत्व कळावे याचे. जेणेकरून जरी प्रत्येक सोसायटीने आपल्या परिसराची स्वच्छता राखण्याची दक्षता घेतली तरी मुंबई अर्धी स्वच्छ राखली जाऊ शकते आणि उर्वरीत मुंबईच्या स्वच्छतेचे काम महापालिकेचे सफाई कामगार करू शकतात.

(हेही वाचा – Sachin Tendulkar : हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाचा, मराठी अभिजात भाषेच्या निर्णयावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया)

स्वच्छता मोहीम केवळ फोटो काढण्यापुरतीच 

परंतु जिथे ३६ ते ३७ आठवडे सखोल स्वच्छता मोहीम अर्थात डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबवून जो परिणाम दिसून आला नाही तो पंधरा दिवसांच्या कालावधीत कुठून दिसणार म्हणा!  मुंबईत स्वच्छतेची लोक-चळवळ निर्माण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सखोल स्वच्छता मोहीम अर्थात डीप क्लिनिंग ड्राईव्ह महापालिकेने ३ डिसेंबर २०२३ पासून हाती घेतली. या मोहिमेला आता ३६ आठवडे पूर्ण झाली आहेत. एवढी दीर्घकाळ चालणारी ही मुंबई महापालिकेची पहिलीच मोहीम असेल. कारण आजवर अशा प्रकारच्या अनेक मोहिमा हाती घेतल्या, पण त्यात सातत्य नव्हते. दोन चार महिन्यांच्या आतच अशा प्रकारच्या मोहिमा गुंडाळल्या गेल्या, नव्हे तर त्यांचा प्रशासनासह जनतेलाही विसर पडला. खरं तर महापालिकेचे हे महा स्वच्छता अभियान आहे. हे अभियान यशस्वी ठरल्यास महापालिकेतील इतर महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये याचे एक मॉडेल तयार केले जाणार असल्याची संकल्पना मांडली. मुळात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे, पण ती केवळ एका महापालिकेची नसून या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आहे आणि स्वच्छता अभियान राबवताना त्यांचे जर फोटो सेशन होत असेल तर ते अभियान केवळ दाखवण्यापुरतंच आहे, याची साक्ष पटते. मुंबईतील ही सखोल स्वच्छता मोहीम आजही निरंतर सुरु असली तरी त्यातून मुंबई किती स्वच्छ झाली, सुंदर दिसू लागली किंबहुना कचरा आणि डेब्रीजमुक्त झाली असे कुठेच दिसून येत नाही.

…तर  मुंबईतील हे परिसर स्वच्छ दिसायला लागतील

अशी मोहीम जर यशस्वी करायची असेल तर सर्वप्रथम सर्व शाळा, गृहनिर्माण संस्था यांना विश्वासात घेऊन आठवड्यात एक दिवस स्वच्छता मोहीम राबवून आपले अंगण आपण साफ करावे असे आवाहन करत त्यांच्याकडून ही स्वच्छता मोहीम राबवायला हवी. यासाठी राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांना विश्वासात घेऊन जर विभागा-विभागांमध्ये आणि वस्त्या-वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली तरच याचे रुपांतर लोक चळवळीत होईल. शाळांमधील मुलांना दर शनिवारी अभ्यासाचा एक तास कमी करून शारीरिक शिक्षण किंवा कार्यानुभवाच्या तासात शालेय इमारती परिसर तसेच शाळेपासून १०० मीटरचा परिसर स्वच्छ करायला लावल्यास मुंबईतील हे परिसर स्वच्छ दिसायला लागतील.

(हेही वाचा – Hindu status : हिंदू धर्माबाबत स्टेटस ठेवले म्हणून अंकितला मारहाण; शाहिद, अयान, हसनैनने दिली जीवे मारण्याची धमकी)

कचरापेट्या असताना बाहेर कचरा टाकतात 

मुळात या स्वच्छता सेवा पंधरवड्यात मला कुठेही पूर्वीप्रमाणे महापालिकेच्या कार्यालयीन इमारतींची स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत राबवली असे दिसले नाही, कुठे तरी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून असे चित्र दिसले नाही तर मग हेच नागरिक जे कचरापेट्या असताना बाहेर कचरा टाकतात आणि कचरा पेट्यांची सुविधा असताना मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकून मोकळे होतात, त्यांच्या स्वभावात बदल करण्याची गरज नव्हती का? त्यांना कुठे कचरा टाकावा आणि कुठे टाकू नये याचे संस्कार करण्याची गरज नव्हती का? मला आजही आठवते आम्ही लहान असताना वर्षांतून तीन ते चार वेळा वस्तीत स्वच्छता मोहीम राबववायचो आणि सणांच्या आधी परिसर स्वच्छ करायचो. जर प्रत्येक वस्त्यांमध्ये महापालिकेचे कामगार येतील, ते साफ करतील असे म्हणून जर वाट पाहत राहिले तरी तुम्हाला कुठेच स्वच्छता दिसणार नाही. श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबववल्यास आपला परिसर आणि पर्यायाने आपला विभाग आणि हे शहर स्वच्छ होऊ शकते. पण याची जनजागृती करण्यात महापालिका प्रशासन कमी पडले, भलेही रेल्वे स्टेशन आणि लोकल गाड्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाजात आवाहन होत असले तरी जोवर महापालिकेच्यावतीने परिपत्रक काढून सोसायट्यांना, मंडळांना कळवले जाता नाही तोवर कुणालाही काही करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे या स्वच्छता पंधरवड्यात महापालिका प्रशासन नागरिकांना सोबत घेऊन परिसर स्वच्छ राखण्यात कमी पडले हे नक्कीच मान्य करावे लागेल आणि आता पूर्वीसारखे मुंबईकर राहिलेले नाही. कारण मुंबईला केवळ पैसे कमवायला आलेल्या लोकांना मुंबई स्वच्छ राहिली काय आणि घाण झाली काय, त्यांना त्याचे काय? मुंबईशी आस्था, प्रेम असणारी मराठी माणसे जेव्हा इथून कमी होऊन दुसऱ्या शहरांत स्थलांतरीत होऊ लागली, तेव्हापासून स्वच्छतेतील लोकसहभाग कमी झालाय हे आता मान्य करावे लागले. त्यामुळे आता उपऱ्यांच्या जीवावर मुंबई चालली असून इथे महापालिकेने कितीही जीव ओतून स्वच्छता केली तरी मुंबई कधीही स्वच्छ दिसणार नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे, हे ध्यानात असू द्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.