कनालवर कृपा करताना, निष्ठावंतांवर शिवसेनेची अवकृपा

किर्तीकर यांना शिर्डी संस्थांनावर पाठवलेले असते तर खऱ्या अर्थाने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटला असता.

147

शिवसेनेच्यावतीने शिर्डी संस्थानावर युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांची निवड करण्यात आली आहे. कनाल हे युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. कनाल हा काही वर्षांपूर्वी युवा सेनेत सक्रीय झाला असून, त्याला शिक्षण समिती सदस्य आणि त्यानंतर शिडी संस्थानाचे सदस्यपद देऊन शिवसेनेने उपऱ्यांना मानाचे स्थान आणि पक्षातील निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. कनाल यांच्या शिर्डी संस्थानातील सदस्य नियुक्तीबाबत युवा सेनेतच काही अंशी नाराजी असून, जर सदस्यपद द्यायचे होते तर मग युवा सेनेचे अमोल किर्तीकर यांना द्यायला हवे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

पक्षात असंतोष

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह १५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेच्यावतीने रविंद्र मिर्लेकर हे उपाध्यक्ष आणि युवा सेना पदाधिकारी राहुल कनाल, खासदार सदाशिव लोखंडे आणि रावसाहेब खेवरे यांची निवड करण्यात आली. मात्र, यामध्ये राहुल कनाल हे युवा सेनेचे पदाधिकारी असून ते मुंबईतील आहेत. युवा सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला किंवा नाशिकमधील पदाधिकारी अथवा नाशिकमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली असती, तर पक्षासाठी ते फायदेशीर ठरले असते. परंतु कनाल यांच्या निवडीनंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मर्जी संपादन करण्यासाठी, अनेकांनी सोशल मीडियावरुन कनाल यांना शुभेच्छा दिल्या. पण कनाल यांच्या या निवडीवरुन युवा सेनेसह पक्षातही असंतोष खदखदत आहे.

(हेही वाचाः युवा सैनिक ठरत आहेत शिवसेनेच्या शाखांचा आधार)

कनाल छाप पाडण्यात अपयशी

राहुल कनाल यांना यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून नेमले आहे. परंतु आजवर कनाल यांना या समितीत आपली छाप पाडता आलेली नाही. या समितीत सदस्य म्हणून नापास ठरले असतानाच पक्षाने त्यांना शिर्डी संस्थानावर सदस्य म्हणून पाठवले.

उभारला सेल्फी पॉईंट 

कनाल हे आदित्य ठाकरे यांच्या प्रचंड विश्वासातील असल्याने त्यांची वर्णी शिर्डी संस्थानावर लागलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्या जवळ असण्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही कनाल कधी विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शिवसेना भवन समोरील राम गणेश गडकरी चौकात ‘जय महाराष्ट्र’ नावाचा सेल्फी पॉईंट कनाल यांनी महापालिकेच्या मदतीने सीएसआर निधीतून बनवला आहे. विशेष म्हणजे याची कल्पना ना आमदार सदा सरवणकर यांना होती, ना स्थानिक शिवसेना नगरसेविका आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांना होती. या दोन्ही लोकप्रतिनिधींना कल्पना न देता केवळ बॉसला सांगून जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मदतीने त्यांनी हा सेल्फी पॉईंट बनवला आहे, त्यामुळेही पक्षात नाराजी आहे.

(हेही वाचाः युवा सेनेच्या ‘त्या’ मागणीचा भाजपने घेतला समाचार!)

अमोल किर्तीकरांना आव्हान

कनाल यांना शिर्डी संस्थानावर पाठवण्याऐवजी युवा सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी व सरचिटणीस असलेले अमोल किर्तीकर यांना पाठवले जावे, अशी इच्छा पदाधिकाऱ्यांची होती. परंतु कनाल यांचे नाव पुढे आल्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काही अंशी नाराजी पसरली आहे. अमोल किर्तीकर हे गोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. गोरेगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आाणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या समीर देसाई यांना पक्षात घेऊन अमोल किर्तीकर यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

तर युवा सेना कार्यकर्त्यांना आनंद झाला असता

त्यापूर्वी युवा सेनेचे सरचिटणीस पद भुषवणाऱ्या किर्तीकर यांच्याऐवजी वरुण सरदेसाई यांच्याकडे हे पद सोपवले. त्यामुळे युवा सेनेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अमोल भैयावरील हा अन्याय आता युवा सेनेसह शिवसेनेतील कार्यकर्त्यांनाही पाहवत नाही. त्यामुळे कनाल यांना शिक्षण समितीवर पाठवून त्यांचे पुनर्वसन केलेले असताना, किर्तीकर यांना शिर्डी संस्थांनावर पाठवलेले असते तर खऱ्या अर्थाने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटला असता, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

(हेही वाचाः भाजपने ८२ नगरसेवक टीकवून दाखवावेत! भाई जगताप यांचे आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.