- प्रतिनिधी
हरियाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारले आहे. हरियाणातील जनतेने फेक नरेटिव्हच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे हरियाणात जे घडले तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात घडेल, असा विश्वास भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी (०८ ऑक्टोबर) व्यक्त केला. हरियाणा विधानसभेचा निकाल हा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आणि मुर्खाच्या नंदवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Haryana Assembly Election : हरियाणात ५७ वर्षात पहिल्यांदाच असे घडले; भाजपची विजयी हॅट्रिक)
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने संपादन केलेल्या नेत्रदीपक विजयाचा जल्लोष मंगळवारी प्रदेश भाजपाच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असा दावा केला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराचा भाजपाला फटका बसला. अशा खोट्या प्रचाराला तशाच थेट पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. लोकसभा निवडणुकीनंतर पहिली परीक्षा हरियाणा, जम्मू-काश्मीर मध्ये होती. या परीक्षेत मतदारांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला स्पष्टपणे नाकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कार्यक्रमाला साथ दिली आहे. हरियाणामध्ये अग्नीवीर योजनेविरोधात अपप्रचार झाला. वेगवेगळ्या समाज घटकांत फूट पाडण्याचे कारस्थान रचले गेले. मतदारांनी हा खोटा प्रचार नाकारत मागील निवडणुकीपेक्षा भाजपाला मोठे यश मिळवून दिले. विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना हरियाणाच्या जनतेने पहिली सलामी दिली असून दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल, असे फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा – Maharashtra Bhavan : अयोध्येत महाराष्ट्र भवन, मंत्री रवींद्र चव्हाणांसह मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन)
जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्यांना जनता त्यांची जागा दाखवून देते. या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ म्हणजे देशातील जनता आजही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. राहुल गांधी यांच्या नाटक आणि नौटंकीला कुणीही भुलणार नाही हे या निवडणुकीने दाखवून दिल्याचे फडणवीस म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये भारताचा, लोकशाहीचा विजय झाला आहे. ३७० वे कलम रद्द झाल्यानंतर तेथे रक्ताचे पाट वाहतील असे म्हणणाऱ्यांना तेथील जनतेने उत्तर दिले आहे. काश्मीरच्या जनतेवर भारतात अन्याय होतो आहे, असा प्रचार आंतरराष्ट्रीय पातळीवर करणाऱ्या पाकिस्तानला काश्मीरच्या जनतेने चपराक लगावली आहे, असेही फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा – मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार; Atul Save यांचे प्रतिपादन)
संजय राऊत यांना टोला
हरियाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने महाराष्ट्रातील महविकास आघाडीच्या नेत्यांनी आज काय बोलायचे याची स्क्रिप्ट तयार करून ठेवली होती. सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याने रात्रीच तयारी करून ठेवली होती. आता मला विचारायचं आहे की, आता कसं वाटतंय? असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला.
दरम्यान, हरियाणामध्ये भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उघडा पडल्याची टीकाही त्यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community