Water Tunnel : दक्षिण मुंबईतील जलबोगद्याला गळती, पण दुरुस्ती करणार कशी?

1453
Water Tunnel : दक्षिण मुंबईतील जलबोगद्याला गळती, पण दुरुस्ती करणार कशी?
  • सचिन धानजी, मुंबई

दक्षिण मुंबईतील कुलाबा ते ग्रॅटरोड, गिरगाव भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याचे (Water Tunnel) बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले असले तरी या जलबोगद्याला काही ठिकाणी गळती लागल्याची माहिती मिळत आहे. या जलबोगद्यातील गळती शोधून दुरुस्ती करण्यासाठी यातील पाणी पुरवठा काही दिवस थांबवावा लागणार असून त्यासाठी पर्यायी जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. परंतु पर्यायी जलवाहिनीची व्यवस्थाच नसल्याने या जलबोगद्यातून या भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात यातील पाणी गळतीद्वारे वाहून जात असल्याने या भागाला कमी पाणीपुरवठा होत आहे. याचा परिणाम या भागातील पाणी पुरवठ्यावर होत असल्याचे बोलले जात आहे.

दक्षिण मुंबईतील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनी बंद करून त्याऐवजी किलाचंद्र गार्डन ते आझाद मैदान अशा जलबोगद्याचे (Water Tunnel) बांधकाम करून त्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. हा जलबोगदा कार्यान्वित झाल्यानंतर मागील काही महिन्यांपासून या जलबोगद्यातून पाण्याची गळती होत असल्याची शंका जलअभियंता विभागाला येत आहे.

(हेही पहा – Diesel Vehicle : भारतात डिझेल वाहने होणार बंद; डेडलाईन जाहिर)

मात्र, जलबोगद्यातून (Water Tunnel) होणाऱ्या गळतीचा शोध घेण्यासाठी महापालिकेला या बोगद्यातील पाण्याचे वहन थांबवावे लागणार आहे. पण या भूमिगत जलबोगद्यातून महापालिकेच्या ए, बी, सी आणि डि विभागाला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या जलबोगद्यातील गळती शोधण्यासाठी पर्यायी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. परंतु पर्यायी जलवाहिनी नसल्याने या जलबोगद्यातील गळती अद्यापही सुरुच असल्याचे बोलले जात आहे. पर्यायी जलवाहिनी टाकायची झाल्यास महापालिकेला १५०० व १२०० मि मी व्यासाच्या दोन जलवाहिनी टाकाव्या लागणार आहे.

याबाबत जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या जलबोगद्यात (Water Tunnel) संशयित पाण्याची गळती आहे. या वॉटर टनेलमधून गळती होत असल्याची दाट शक्यता असून त्यासाठी वॉटर टनेलमधील पाणीपुरवठा पूर्णपणे थांबवून ही गळती शोधणे सोपे जाणार आहे. परंतु पर्यायी जलवाहिनीची व्यवस्था नसल्याने यातून होणाऱ्या गळतीबाबत प्रशासन काहीही करू शकत नाही. त्यामुळे सल्लागारांच्या सल्ल्यानुसार या भागातील पाणी पुरवठ्यावर भविष्यात कोणताही परिणाम होऊ नये तसेच येथील पुरवठा खंडित करावा लागू नये यासाठी दोन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच केली जाईल, त्यानंतर जलवाहिनीची पर्यायी व्यवस्था झाल्यानंतरच वॉटल टनेलमधील गळतीचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.