संवाद हा फक्त बोलण्यातून नव्हे, तर वागण्यातून व हावभावातून जाणवतो. दररोज वृत्तपत्रात बाल लैंगिक शोषणाविरुद्धच्या बातम्या वाचून प्रत्येकाचेच मन हेलावून जाते. लैंगिक शोषणाविरुद्ध शिक्षक, पालक विद्यार्थ्यांनी साखळी करून त्याला भेदण्याची आवश्यकता आजच्या काळात आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहे. मुलींनो अत्याचार सहन करू नका, तर त्याविषयी विश्वासू व्यक्तीकडे व्यक्त होण्याचे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले. (Child Sexual Abuse)
(हेही वाचा – दक्षिण कोरियाच्या लेखिका Han Kang यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहिर)
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शिक्षिका, विद्यार्थिनी व महिला पालकांसाठी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यावर आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना प्रधान जिल्हा न्यायाधीश शेंडे बोलत होत्या.संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याची अल्पवयीन मुली व त्यांच्या पालकांना माहिती व जबाबदारीचे प्रबोधन होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया यांनी बाल लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी मुलीं व पालकांमध्ये जागृती आवश्यक आहे. त्यामुळे या अत्याचाराच्या विरोधात मुली धाडसानेसामना करू शकणार असल्याचे स्पष्ट करुन या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापिका आशा सातपुते यांनी करून दिला.
पुढे बोलताना शेंडे म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, फोन वर आलेल्या अनोळखी लिंकला फॉलो करू नका, तसेच कोणावरही विश्वास टाकू नये,आपल्या पालकांना व शिक्षकांना विश्वासात घ्यावे. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ ही ठरलेली असते परंतु चुकीच्या वयात आपण काय करतो याचा विद्यार्थ्यांनी निश्चितच विचार करायला पाहिजे. पालक जर स्वतः च आपला मौल्यवान वेळ मुलांना न देता मोबाईल इंस्टाग्राम व फेसबुक याला जास्त वेळ देत असेल तर निश्चितच पालकांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवे व आपण कुठे चुकत आहोत का? याचाही विचार करायला पाहिजे. आपल्या पाल्यांशी मनमोकळा संवाद साधायला हवा. संवादाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, बाल लैंगिक अत्याचार होण्याची मुख्य कारणे म्हणजे विद्यार्थ्यांचा मोबाईलचा अतिवापर.आज प्रत्येक स्त्री पुरुष अर्थाजनासाठी घराबाहेर पडत असल्याने त्यांचा व विद्यार्थ्यांचा संवाद हा लुप्त होत आहे. घरामध्ये आजी-आजोबा यांची पोकळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणजे मोबाईल फोन वाटतो. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे हे नात्यातील, ओळखीच्या व्यक्तीं कडूनच मोठ्या प्रमाणात होतात.बरेचदा पालक आपल्या मुलांवरती विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे मुले एकलकोंडी बनतात त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाहीत,कोणावरती विश्वास ठेवावा हे त्यांना समजत नाही. गुन्हे घडण्या चे ५० ते ६० टक्के कारण मोबाईल फोन वरती झालेल्या ओळखीतूनच होतात. बऱ्याचदा अशा प्रकारचे अत्याचार झाल्यानंतर पालक त्याची वाच्यता कुठेही होणार नाही यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळेच असे गुन्हेगार समाजा मध्ये मोकाट फिरतात. तरी पालकांनी घाबरून न जात अशा गुन्ह्यांची माहिती पोलीस ठाण्यामध्ये द्यायलाच हवी. विद्यार्थीनींना कोंणत्याही मदतीसाठी १५१०० डायल करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर अत्याचाराच्या प्रकरणामध्ये फिर्यादीची ओळख ही गुप्त राखली जाते.यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये बाल स्नेही पोलीस कक्ष असतो, तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास लवकर होण्यासाठी फास्टट्रॅक कोर्ट चालविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शरीराच्या भागांची ओळख करून द्यायला हवी. तसेच गुड टच बॅड टच कशास म्हणतात याबद्दलही त्यांनी जागृती केली. (Child Sexual Abuse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community