देशभरात ७३ लाख लसींच्या मात्रा शिल्लक!

146

देशभरात लसीकरणाची मोहीम जोरदार सुरु आहे. सध्या देशात १८ वयोगटापासून पुढील सर्व वयातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले आहे. २१ जूनपासून केंद्र सरकारने लसींच्या पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण आणले आहे. केंद्राने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण ३२ कोटी १३ लाख ७५ हजार ८२० कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रा पुरवल्या आहेत. तब्बल ७३ लाख १६६ मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही शिल्लक आहे. केंद्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही माहिती उघड झाली.

३१,४०,७५,६५४ मात्रा वापरल्या गेल्या!

भारत सरकारने आतापर्यंत विनामूल्य आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून ३२.१३ कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (३२,१३,७५,८२०) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध केल्या, ७३ लाख १६६ मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही शिल्लक आहे. वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह ३१,४०,७५,६५४ मात्रा वापरल्या गेल्या आहेत. याशिवाय, २४ लाख ६५ हजार ९८० लसींच्या मात्रा पुढील 3 दिवसात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होणार आहे.

(हेही वाचा : कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना नुकसान भरपाई द्या! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश)

राज्यांना लसींच्या पुरवठ्याची आगाऊ माहिती!

देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला २१ जून २०२१ पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसी उपलब्ध करून देण्यासंबंधी आगाऊ माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल, असे केंद्राच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केंद्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा पुरवठा विनामूल्य केला जाईल, असेही केंद्राने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.