विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) उत्साहपूर्ण सोहळा संपन्न झाला. गिर्यारोहणासारख्या अत्यंत साहसी क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२४’चा (Shikhar Savarkar Puraskar) वितरण सोहळा ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात गिर्यारोहणात गगनचुंबी कातळभिंती आणि बेलाग सुळक्यांवर शास्त्रशुद्ध आणि कलात्मकरित्या आरोहण करणारा उदयोन्मुख इंद्रनील खुरंगळे यांना ‘युवा साहस पुरस्कार’ देण्यात आला. त्यांच्यासोबत हिमालयीन गिर्यारोहणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल यांना मानाचा ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर गिर्यारोहणाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन करणाऱ्या आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या रायगड येथील सिस्केप या संस्थेला ‘उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था’ म्हणून गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला पद्मश्री के. सरस्वती, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर आणि पहिल्या शिखर सावरकर मोहिमेचे मोहीम नेता देवेंद्र गंद्रे हे मान्यवर उपस्थित होते.
श्रेय माझे सर्व सहकारी आणि प्रशिक्षकांना – इंद्रनील खुरंगळे
मी वर्ष २००४ पासून पर्वतारोहण करत आहे. माझ्या प्रशिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला विविध मोहिमांमध्ये सहभागी करून घेतले, यामुळे मी इथेपर्यंत प्रवास करू शकलो. या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय माझे सर्व सहकारी आणि प्रशिक्षक यांचे आहे, अशा शब्दांत इंद्रनील खुरंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यात इंद्रनील खुरंगळे (Indranil Khurangale) यांच्या गिर्यारोहणाची रोमांचक चित्रफीत दाखवण्यात आली.
राष्ट्रगीत आणि राज्यगीताने आरंभ झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कलांगणच्या विद्यार्थ्यांनी शौर्यगीत सादर केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फणसे आणि त्यांची मुले वीर आणि शर्वरी फणसे यांनी वीररसातील पोवाडा सादर केला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर पुरस्कारप्रदान सोहळा संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सुसंवादक कुणाल रेगे यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
‘या’ मान्यवरांना मिळाला आहे ‘शिखर सावरकर पुरस्कार’
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः हिमालयीन विभागात अतुलनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ भारतीय दिग्गजांकरीता ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. याआधी कर्नल (निवृत्त) प्रेमचंद, पद्मश्री सोनम वांग्याल, ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच सह्याद्री विभागात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट साहसी गिर्यारोहकांकरीता एक वैयक्तिक आणि सह्याद्री विभागातच उत्कृष्ट साहसाबरोबरच इतर पूरक कामासाठी एक सांघिक अर्थात संस्थात्मक स्तरावर दिला जाणारा पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार दिले जातात. (Shikhar Savarkar Puraskar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community