मला कोणी हलक्यात घेऊ नका; मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा; CM Eknath Shinde यांचा इशारा

आम्ही दिल्लीला जातो प्रकल्प आणण्यासाठी, मला मुख्यमंत्री करा सांगायला जात नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे हाणला.

304

शिवसेनेत उठाव केल्यानंतर आमचे सरकार पडणार, अशी आवई उठवली जात होती. परंतु जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घरात बसून नव्हे, तर ठासून अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी शिवसैनिक आणि आनंद दिघे यांचा चेला आहे. मला कोणीही हलक्यात घेऊ नये, मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आझाद मैदानातील दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विरोधकांना दिला. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा सांगणारे आता पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे एमआयएम आणि ठाकरेंमध्ये फरक राहिलेला नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. दरम्यान, आम्ही पुन्हा सत्तेत येणार, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या सभेतून मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रहार केला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ गर्व से कहो हम हिन्दू हैं’, ही गर्जना करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाची सुरुवात करायचे तेव्हा सर्वांच्या अंगावर रोमांच उभा राहायचा. परंतु, काही जणांना आता हिंदुहृदयसम्राट म्हणायला लाज वाटते. जीभ देखील कचरू लागली. आम्हाला मात्र अभिमान आणि स्वाभिमान वाटतो, अशा शब्दांत ठाकरेंवर निशाणा साधला. राम मंदिर असो किंवा सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न असो. बाळासाहेबांची सगळी स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही शिंदे (CM Eknath Shinde) यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचाच रंग आम्ही बदलला, अशी जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी करताना उद्धव ठाकरे यांचा नर्मदेतील गोटे असा उल्लेख केला.

धारावीबाबत उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

धारावीबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही त्यांनी यावेळी उत्तर दिले. धारावी हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प, त्यात देखील त्यांनी काड्या घालण्याचे काम केले. पहिला कंत्राटदार रद्द केला तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा पण धारावीकरांना त्याच चिखलात खितपत ठेवायचे काम केले. तसेच आधीचे मुख्यमंत्री म्हणत होते, धारावीतील फक्त पात्र लोकांना घरे देणार, परंतु, सगळ्या २ लाख १० हजार जणांना घरे द्या असे सांगत, मी ते करतो आहे. गिरणी कामगारांना देखील घरे मिळत नव्हती, महायुती सरकारने गिरणी कामगारांना घरे द्यायला सुरुवात केल्याचे सांगत महाविकास आघाडी आणि ठाकरेंचा समाचार घेतला.

(हेही वाचा Jyoti Waghmare यांनी केले उध्दव ठाकरेंचे नामकरण, म्हणाल्या, उध्दव…!)

आघाडीचे स्पीड ब्रेकर उखडून टाकले

महाविकास आघाडीत सत्तेत असताना प्रकल्पांना स्पीड ब्रेकर लावला. उठाव केल्यानंतर आम्ही हे सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले. ज्या सरकारने ते करायचे काम केले होते त्या सरकारलाही उखडून टाकले, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराचा समाचार घेतला. आता माझी दाढी त्यांना खूपते आहे. मात्र दाढी होती म्हणून तुमची उद्धवस्त केली महाआघाडी. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी, अशी कविता करत शिंदेनी (CM Eknath Shinde) विरोधकांवर घणाघात केला.

आणखी महामंडळे

मंत्रीमंडळ बेैठकीत विविध समाजासाठी महामंडळे जाहीर केल्याचे सांगत आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्याला होलार समाजासाठी महामंडळ नसल्याचे सांगितले. होलार समाजासाठीही हे सरकार महामंडळ स्थापन करेल. गर्दीतून वंजारींसाठी अशी घोषणा एकाने केल्यानंतर वंजारी समाजासाठी ही महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुंबईकरांना मुंबईत आणू

आम्ही उठाव केला नसता तर पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण झाले असते. महाराष्ट्रही अजून मागे अशाच गेला असता. महायुतीचे सरकार सत्तेत येताच उद्योग, गुंतवणूक पहिल्या क्रमांकावर आहोत. शेतकरी वर्गाला देखील मोठा दिलासा दिला. दहा लाख सुशिक्षित तरुणांना रोजगार दिले. मुंबईत मेट्रो आणि रस्ते जाळे विणले आहेत. महिला, तरुण, बहिणी आणि ज्येष्ठांना सन्मान दिला. राज्यात विकासकामांना ब्रेक लावणारी महाविकास आघाडीच उखडून टाकली. मुंबई झोपडपट्टी मुक्त करू. तसेच मुंबई बाहेर फेकलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणू. पुनर्विकासाचे बंद पडलेले सर्व प्रकल्प सरकार ताब्यात घेऊन ते पुर्ण करेल, असे शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

आम्ही प्रकल्प आणण्यासाठी दिल्लीत जातो मुख्यमंत्री करा म्हणून नाही

आम्ही दिल्लीला जातो प्रकल्प आणण्यासाठी, मला मुख्यमंत्री करा सांगायला जात नाही. पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यादिवशी आशाताई यांनी देखील आमच्या सरकारचे कौतुक केले. सरकारची योजना गोरगरिबांना मदत करणाऱ्या आहेत. तुम्ही घरात बसून कोविड टेस्ट करत होता. कोणी भेटायला आलं त्याला बाहेर काढले. हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही. तुम्ही काय काम केले ते चार चौघात सांगू शकणार नाहीत. योग्य वेळ येईल तेव्हा नक्की सांगू, असे आव्हान दिलं, तसेच ठाकरेंच्या अहंकारामुळे मेट्रो कार शेड प्रकलप रखडला. राज्याच्या तिजोरीवर यामुळे १७ हजार कोटींचे कर्ज वाढले. आता ते वाचले असते तर आज लाडक्या बहिणीला ३ हजार दिले असते, असे शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार

लाडक्या बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना या बहिणी जोडा दाखवतील. लोकसभेला फेक नेरेटिव्ह पसरवला. काँग्रेसच्या वोट बँकेवरती जागा जिंकल्या. तरीही शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त होता. आता तर जनतेला सगळं कळून चुकले आहे. त्यामुळे कोणी कितीही सांगितले. तरी हरियाणा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, असे शिंदे यांनी म्हटले. राज्यात महायुती सरकार स्थापन होताच केंद्रकडून भरभरून निधी मिळाला. महाराष्ट्राला आणून ठेवलं अभिजात भाषेचा दर्जाही केंद्राने दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे सांगत राज्यात संविधान भवन, बुध्द भवन बांधत असल्याचे सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.