Baba Siddique हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली; समोर आले पुणे कनेक्शन

आता पोलीस या प्रकरणाशी निगडित असणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. पुण्यातील शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके पुणे तसेच परराज्यात रवाना झाले आहेत.

270

माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. तीन आरोपींनी भर रस्त्यावर त्यांना गोळ्या घातल्या. यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, याच तिसऱ्या फरार आरोपीची ओळख पटली आहे. हा आरोपी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता, असे समोर आले आहे.

स्क्रॅप डिलरकडे करायचा काम

बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव शोधले आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आरोपीची इतरही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार तिसरा आरोपी हा पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतोय. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतले होते.

(हेही वाचा लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली Baba Siddique यांच्या हत्येची जबाबदारी! सोशल मीडियावरुन कबुली)

एका आरोपीवर याआधीच हत्येचा गुन्हा 

त्यानंतर हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची गुरुमेल याच्याशी भेट घडवून आणली होती. गुरुमेल हा 23 वर्षांचा आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी त्याच्याविरोधात एक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मराज आणि गुरमेल यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

शिवा सध्या फरार

आता पोलीस या प्रकरणाशी निगडित असणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. पुण्यातील शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके पुणे तसेच परराज्यात रवाना झाले आहेत. या हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या आरोपीचाही शोध घेत आहेत. दरम्यान, एका सोशल मीडियावरील पोस्टनुसार बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमान खानला मदत करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू अशा आशयाची ही पोस्ट आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव पुढे आल्यामुळे आता या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.