- विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोडवला जात असून यंदा आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागण्याची शक्यता असतानही महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यास प्रशासन देईल तीच रक्कम घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांना स्वस्थ बसावे लागेल. मात्र, त्या आधी निर्णय झाल्यास शिंदे सरकार काही वाढीव रक्कम जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु कोणत्याही परिस्थिती महापालिका कर्मचाऱ्यांना २६ हजारांपेक्षा एकही पैसा वाढवून देण्यास प्रशासन तयार नसून जर शासनाने यात वाढ केल्यास वाढीव रक्कम शासनाने दयावी अशाप्रकारच्या हालचाली सुरु आहे. त्यामुळे २६ हजार पेक्षा सानुग्रह अनुदानाचा एकही रुपया वाढवून मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेने (BMC) यंदा २६ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानासाठी सुमारे २६० कोटी रुपयांची तरतूद केलेली असून त्यात कोणत्याही प्रकारची वाढ न देण्यावर प्रशासन ठाम असल्याचे बोलले जात आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये ठाकरे सरकार आल्यानंतर त्यानंतरच्या पहिल्या दिवाळीमध्ये आजवर महापौरांच्या दालनात होणारा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोडवला गेला. त्यामुळे १५ हजार ५०० रुपयांच्या तुलनेत जिथे ५०० रुपयांची वाढ अपेक्षित असताना तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सानुग्रह अनुदानाची रक्कम थेट २० हजार एवढी केली. मात्र, सानुग्रह अनुदानाची रक्कम २० हजार रुपये करताना पुढील तीन वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही अशाप्रकारची अट घालून त्यानुसार कामगार संघटना आणि प्रशासन यांनी करार केला.
(हेही वाचा – Baba Siddique बॉलिवूड आणि मुंबईच्या बांधकाम लॉबीवर प्रभाव टाकणारा नेता; सोशल मीडियातील वादात सापडला)
मात्र,त्यानंतर ठाकरे सरकार जावून शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर त्यांनी यापूर्वीचा करार मोडून २० हजार रुपयांऐवजी सानुग्रह अनुदानाची रक्कम २२,५०० रुपये एवढी केली. तसेच मागील दिवाळीमध्ये पुन्हा ही वाढ देत सानुग्रह अनुदानाची रक्कम २६,००० रुपये एवढी केली.
त्यामुळे यंदा पुन्हा दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी कामगार संघटनांकडून केली जात आहे.
यंदा दिवाळी २८ ऑक्टोबर रोजी असून त्यासाठी किमान दहा ते बारा दिवस आधी दिवाळी भेटीची रक्कम मिळावी अशाप्रकारची धारणा असते. त्यामुळे दिवाळी भेट म्हणून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय त्वरीत दिल्यास पुढील परिपत्रक आणि सर्वप्रकारच्या सोपस्कार करता आठ दिवस जातील. त्यामुळे जसा याला विलंब होईल तेवढी अनुदानाची रक्कम उशिराने मिळेल. मागील तीन वर्ष मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन सानुग्रह अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यामुळे जिथे वर्षांला ५०० रुपयांची वाढ केली जात होती, तिथे प्रथम ४५०० रुपये, २५०० रुपये आणि ३५०० अशाप्रकारे वाढ केली. त्यातच आता आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागण्याची शक्यता असल्याने जर आचारसंहिता लागल्यास कर्मचाऱ्यांना मागील वर्षी प्रमाणेच २६ हजार रुपये एवढीच रक्कम मिळेल, परंतु जर त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यास त्यांनाही यात कोणतीही वाढ न करण्याची विनंती प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यानंतरही जर मुख्यमंत्र्यांनी रक्कम वाढवण्याची घोषणा केल्यास २६० कोटींपेक्षा अधिक येणारा खर्च शासनाने द्यावी अशाप्रकारचीही विनंती प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – मविआ सरकार आल्यास ‘या’ योजना बंद होणार, Chandrasekhar Bawankule यांनी सांगितला ठाकरेंचा नवा प्लॅन)
अशाप्रकारची वाढली गेली सानुग्रह अनुदानाची रक्कम
दिवाळी २०२३ : सानुग्रह अनुदानाची रक्कम २६,००० रुपये
दिवाळी २०२२ : सानुग्रह अनुदानाची रक्कम २२,५०० रुपये
दिवाळी २०२१ : सानुग्रह अनुदान रक्कम २०,००० रुपये
दिवाळी २०२० : सानुग्रह अनुदानाची रक्कम १५,५०० रुपये
दिवाळी २०१९ : सानुग्रह अनुदानाची रक्कम १५,००० रुपये
दिवाळी २०१८ : सानुग्रह अनुदानाची रक्कम १४,५०० रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community