राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder) यांची शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तीन आरोपींनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडल्या. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना १४ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने एकाच आरोपीची ७ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली, तर दुसऱ्या आरोपीने तो अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने न्यायालयाने आता त्याच्या वयाची सत्यता पडताळण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे.
(हेही वाचा Baba Siddique बॉलिवूड आणि मुंबईच्या बांधकाम लॉबीवर प्रभाव टाकणारा नेता; सोशल मीडियातील वादात सापडला)
आरोपीची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश
बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder) यांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या आरोपीपैकी गुरमैल सिंह आणि आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना १४ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. पण, न्यायालयाने आरोपी गुरमैल सिंह यालाच पोलीस कोठडी दिली. गुरमैल सिंह याला सात दिवसांची म्हणजे २१ ऑक्टोबरपर्यंतच पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली नाही. त्याच्या वयाच्या मुद्द्यासंदर्भात कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने या आरोपीची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ऑसिफिकेशन टेस्टनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यास सांगण्यात आले आहे. आरोपीचे वय निश्चित किती आहे, हे जाणून घेण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट केली जाते.
Join Our WhatsApp Community