दिल्लीतील आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Sahitya Samelan) स्थानिकांसह आसपासच्या परिसरातून आणि महाराष्ट्रातून सुमारे पाच हजार रसिक येण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी तालकटोरा इनडोअर स्टेडिअम हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. दिल्लीत रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवणे शक्य नसल्याने त्या दृष्टीने संमेलनातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.
साहित्य संमेलनात (Sahitya Samelan) एकाच वेळी तीन ते चार मंडपांमध्ये विविध कार्यक्रम सुरू असतात. तसेच ग्रंथ प्रदर्शनाचाही स्वतंत्र मांडव असतो. गतवर्षी अमळनेरला झालेल्या संमेलनात सगळ्या मांडवांमध्ये बरेच अंतर असल्याने एका मांडवातून दुसरीकडे जाताना रसिकांची आणि साहित्यिकांची दमछाक झाली होती.
यंदा मात्र दिल्लीतील संमेलन स्थळ असणाऱ्या तालकटोरा स्टेडिअमच्या परिघातच संमेलनाचे सर्व मांडव उभे करणार असल्याने रसिकांची पायपीट वाचणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाबाबतही प्रकाशकांची नाराजी लक्षात घेऊन यंदा त्यात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न साहित्य महामंडळ करत आहे.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राममंदिराच्या शिखराचे बांधकाम चालू; कसा असेल कळस ?)
‘संमेलनाला महाराष्ट्रातून सुमारे दोन ते अडीच हजार नागरिक येण्याची अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सोडली जावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवास व्यवस्थेसाठी महाराष्ट्र सदन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, जैन भवन आदी ठिकाणे उपलब्ध आहेत’, अशी माहिती संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या ‘सरहद, पुणे’ संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी दिली. दिल्लीत अनेक मराठी सनदी अधिकारी, स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह एकूण पाच हजार रसिक संमेलनाला येण्याची अपेक्षा संयोजकांना आहे.
दिल्लीतील संमेलनाला येणारे बहुभाषिक रसिक लक्षात घेता यंदा परिसंवादांचे आणि चर्चासत्रांचे विषयही फारसे समीक्षणात्मक न ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तसेच एरवी संमेलनात रात्री उशिरापर्यंत रंगणारी कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमही दिल्लीतील वातावरणामुळे सायंकाळी लवकरच संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community