सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर सर्वात जास्त मिरच्या शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना झोंबत असतात. ईडीच्या नोटीसनंतर राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर खुद्द शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. देशमुख यांच्या नोटीसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रतिक्रीया दिली नाही. असे असताना राऊतांना यावर बोलण्याची काय गरज?, असा सवाल शिवसैनिकांकडून केला जात आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळेच शिवसेनेला अधिक लक्ष्य केले जात असल्याचे शिवसैनिकांकडून बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच जर याचे काही पडले नाही, तर राऊत यांनी यावर तोंड का उघडावे, असाही सवाल शिवसैनिकांकडून दबक्या आवाजात केला जात आहे.
राऊत सेनेचे नव्हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते?
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जातात. तर काही जण त्यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून करतात. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीची नोटीस पाठवल्यानंतर राऊत हिरीहिरीने माध्यमांसामोर आले आणि एनसीपीच्या नेत्यांच्या याआधी प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले. भाजपची राज्यात सत्ता न आल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यातून ते असे आरोप करत आहेत, असे शरद पवार म्हणाले. त्यावेळीही राऊत यांनी हीच री ओढत माध्यमांसमोर गोंधळा घातला.
(हेही वाचाः पडळकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस का चिडली?)
राष्ट्रवादीशी युती म्हणजे सेनेचा स्वतःच्या पायावर धोंडा!
राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत. परंतु शिवसेनेच्या मंत्र्यांवर जेव्हा अशाप्रकारचे आरोप होतात. त्यांना ईडीची नोटीस पाठवली जाईल, तेव्हा राऊत यांनी यावर विधान करणे अपेक्षित आहे. अनिल देशमुख यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर त्यांच्या पक्षाचा एकही नेता बोलला नाही, मग शिवसेनेने नको तिथे त्यांना आपल्या अंगावर का घ्यावे, असा सवाल शिवसैनिकांकडून केला जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती महापालिका निवडणुकीत झाल्यास जास्त जागा निवडून येतील, असा दावा राऊत करत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील ताकद किती आहे. उलट शिवसेनेसोबत युती करून राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या जातील, असेही शिवसैनिकांकडून बोलले जात आहे. राऊत यांनी शिवसेना संघटनात्मक वाढीच्या दृष्टीकोनातून विचार करायला हवा. शिवसेनेला आज युतीची नव्हे तर स्वबळाची गरज आहे. शिवसेनेएवढे प्रत्येक भागांमध्ये कोणत्याही पक्षाचे जाळे नाही. त्यामुळे युती करणे त्यांची गरज आहे. यापेक्षा राष्ट्रवादीतील निवडून येणाऱ्या नगरसेवकांना आपल्या पक्षात घ्या, अशीही चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरु आहे.
पवारांचे बोल राऊतांचे तोंड!
राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विचार करून कधीच बोलत नसतात. तर शरद पवार यांनी जे फिडींग केलेले असते ते बोलत असतात. आणि पवारांना जे वाटते ते राऊत यांच्याकडून वदवून घेतात, असेही शिवसैनिकांकडून बोलले जात आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय स्तरावरील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु या आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष कुठेच नाही. पण राऊत यांनी सर्व प्रथम ‘सामना’तून यावर चिडून काँग्रेसला डिवचले होते. त्यानंतर काँग्रेसशिवाय या विरोधी पक्षांच्या आघाडीला पर्याय नाही, अशी जाहीरपणे प्रतिक्रीया दिली होती. हे बोलतांनाही त्यांनी शरद पवार यांच्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे संजय राऊत हे शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचाच अधिक विचार आणि पक्षाची चिंता करत असतात, असेही शिवसैनिकांकडून ऐकायला मिळत आहे.
(हेही वाचा : ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरजः शिवसेनेचे आमदार बरळले)
Join Our WhatsApp Community