भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर झालेल्या दगड हल्ल्यानंतर मुंबईत आणखी एका भाजप नेत्याच्या वाहनावर पेव्हर ब्लॉकने हल्ला करून धमकी देण्यात आल्याची घटना कुर्ला पश्चिम येथे घडली. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर उतरला आहे, असे चित्र पहायला मिळत आहे.
हाजी अराफत शेख असे या भाजप नेत्यांचे नाव आहे. भाजपच्या महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे पदाधिकारी असणारे शेख हे कुर्ला पश्चिम येथील एलबीएस रोड येथे राहण्यास आहे. शिवसेना, त्यानंतर मनसे पुन्हा शिवसेना आणि आता भाजपामध्ये गेलेल्या हाजी अराफत शेख यांचा असा राजकीय प्रवास आहे. बुधवारी मध्यरात्री ते राहत असलेल्या इमारतीत दोन अज्ञात इसमांनी प्रवेश करून हाजी शेख कुठे रहातात, असे सुरक्षा रक्षकाला विचारून आत प्रवेश केला. दरम्यान पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शेख यांच्या वाहनांची पुढच्या काचेवर पेव्हर ब्लॉक फोडून त्यात त्यांनी धमकीची एक चिठ्ठी फेकून पोबारा केला.
(हेही वाचा : पडळकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस का चिडली?)
काय म्हटले चिठ्ठीत?
या चिठ्ठीत ‘तुझे आखरी चेतावनी दे रहा हू, बीजेपी छोड दे, लोगों को गुमराह करना बंद कर, अगली बार पथ्थर नही कुछ और होगा। बीजेपी छोड….” असे लिहण्यात आले होते. गुरुवारी हाजी अराफत शेख यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community