सर्व राज्यांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पण राज्यात मात्र अजूनही गोंधळ कायमच आहे. आता तर अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादाचा फटका या निकालाला बसण्याची शक्यता असून, यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले असताना, आता अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत.
मूल्यमापनाचे धोरण मंत्रालयात अडकले
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीचे धोरण हे मागील आठवड्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून(एससीईआरटी) तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याचा अहवाल देखील शिक्षण विभागाकडून मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. मात्र शिक्षण मंडळातील काही अधिकाऱ्यांमध्ये या धोरणासोबत सीईटी परीक्षा कोण घेणार, यावरुन वाद असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः राज्याचा बारावीचा फॉर्म्युला ‘३०:३०:४०’? ‘त्या’ विद्यार्थ्यांवर होणार अन्याय?)
निकालाला होणार उशीर?
एवढेच नाही तर बारावीच्या अंतर्गत मूल्यमापन संदर्भातील कार्यपद्धतीचे धोरण मंत्रालयात अडकून पडल्याची देखील माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान बारावीचा निकाल कसा जाहीर करायचा, याबाबत अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे, यावर अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नसल्याने आता निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.