Baba Siddique Death : बाबा सिद्दिकी हत्येशी शाहिद बलवांचा संबंध काय? शाहिद बलवा कोण आहेत?

Baba Siddique Death : डीबी रियाल्टी कंपनीचे उपाध्यक्ष शाहिद बलवा बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.

305
Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि बांधकाम व्यावसायिक बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे असलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा कांगोरा मुंबई पोलीस तापसून पाहत आहेत. त्या दृष्टीने त्यांच्या रडारवर आहेत बांधकाम व्यावसायिक आणि डीबी रियाल्टीचे उपाध्यक्ष शाहिद बलवा. बाबा सिद्दिकी यांचा काही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना विरोध होता. यातील एका प्रकल्पाचं कंत्राट डीबी रियाल्टीची एक उपकंपनी वेलोर इस्टेट आणि लार्सन अँड टुब्रो यांच्याकडे होतं. तोच धागा पोलीस तपासून पाहत आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील संत ज्जानेश्वरनगर भारतनगर या दोन झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब प्रयत्नशील होते. याचवर्षी जून महिन्यात वेलोर इस्टेट आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांनी संयुक्तपणे ही जागा विकसित करण्यासाठी प्रकल्पाची घोषणाही केली होती. आणि १० एकरच्या या जागेत रहिवासी संकुल, पंचतारांकित हॉटेल, कार्यालयीन जागा आणि उच्चभ्रू निवासी संकुल उभं राहणार होतं. या प्रकल्पाला सिद्दिकी यांचा विरोध होता. प्रकल्पाविषयी पुरेशी माहिती मूळ रहिवाशांना दिली जात नसल्याचं सांगत त्यांनी इथं आंदोलनाची तयारी सुरू केली होती. या वैमनस्याचा सिद्दिकी यांच्या हत्येत कुठे संबंध आहे का याचा तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत. (Baba Siddique Death)

(हेही वाचा – Governor appointed MLA : राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार)

त्या निमित्ताने ज्या शाहिद बलवा यांचं नाव समोर आलंय ते शाहिद बलवा कोण आहेत ते पाहूया.

उद्योग जगतात त्यांची ओळख ३७ व्या वर्षी अब्जाधीश होऊन फोर्ब्सच्या यादीत वयाने सगळ्यात लहान अब्जाधीश झालेले भारतीय अशी आहे. भारतातील ते ६६ व्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत. आणि त्यांची एकूण मालमत्ता १.०६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. २००६ मध्ये डीबी रियाल्ची ही कंपनी स्थापन केल्यानंतर ५ वर्षांत त्यांनी ती नावारुपाला नेली. आणि कंपनीची उलाढाल अब्जावधीत नेली. विनोद गोयंका यांच्या साथीने त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती. सध्या ते कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

पण, खरंतर एवढीच बलवा यांची ओळख नाही. २००९ मध्ये उघड झालेल्या २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सहभागासाठी त्यांना तुरुंगाची हवा खायला लागली आहे. दूरसंचारमंत्री ए राजा यांच्या कार्यकाळात हा घोटाळा घडून आला. आणि डी रियाल्टीने राजा यांच्या निकटवर्तीयांच्या मालकीच्या एका मीडिया कंपनीला २ अब्ज रुपये हस्तांतरित केल्याचं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या तापासात समोर आलं होतं. या प्रकरणी शाहिद, त्यांचे भाऊ अल्ताफ आणि कंपनीच्या आणखी एका अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली होती. ९ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली. आणि २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खटल्यातून निर्दोष मुक्त केलं. पण, या कालावधीत डीबी रियाल्टीचं साम्राज्य वाढतच होतं. (Baba Siddique Death)

(हेही वाचा – Election Commission : महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभा निवडणूक; तारीख जाहिर)

राजकारणी लोकांशी जवळीक आणि राजकीय हितसंबंधांचा उद्योगासाठी वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर वेळोवेळी झाला आहे. खासकरून, राष्ट्रादीचे संस्थापक शरद पवार यांच्या जवळचे उदयोजक असल्याची टीका त्यांच्यावर नेहमी झाली. गुजरातच्या फिरोझापुरा गावात कुटुंबाच्या मालकीच्या जुन्या हवेतील १९७४ मध्ये त्यांचा जन्म झाला. पण, वडील मुंबईत मुंबई सेंट्रल इथं बलवा हॉटेल चालवत होते. त्यामुळे कुटुंबाचा मुक्काम मुंबईतच होता. सेंट मेरीज् मधून शालेय शिक्षण घेतल्यावर बलवा यांनी कॉलेज अर्धवटच सोडलं. आणि वडिलांना ते उद्योगात मदत करू लागले. १९९० मध्ये हे कुटुंब मुंबई सेंट्रलची जागा सोडून वांद्रे इथं राहायला लागले. इथं जमीन घेऊन त्यांनी त्यावर अल्मेडा पार्क नावाने स्वत:चा बंगला बांधला आहे.

बलवा यांना हॉटेल व्यवसायाबरोबरच सुरुवातीपासून बांधकाम व्यवसायाबद्दल कुतुहल होतं. अखेर २००६ मध्ये त्यांनी विनोद गोयंका यांच्याबरोबर भागिदारीत डीबी रियाल्टी कंपनी स्थापन केली. सुरुवातीपासून या कंपनीने यश पाहिलं. आणि आतापर्यंत २१ लाख वर्ग फूटांची जागा या कंपनीने विकसित केली आहे. तर त्यांच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार, आणखी ४० लाख वर्गफुटांच्या जागेवर बांधकाम सुरू आहे. (Baba Siddique Death)

(हेही वाचा – EVM पूर्णत: सुरक्षितच, कशी घेतली जाते खबरदारी?)

पण, हे साम्राज्य असंच उभं राहिलेलं नाही. खासकरून वांद्रे पूर्वला असलेल्या सरकारी निवासस्थानांच्या वसाहतीच्या प्रक्रियेच्या वेळी डीबी रियाल्टीवर जोरदार आरोप झाले होते. निविदा प्रक्रिया सदोष असल्याचा आणि त्यात नियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आरोप तेव्हा झाले होते. डीबी रियाल्टीचं काम मंत्रालयातून झटपट मंजूर होतं, असंही बांधकाम व्यावसायिकांच्या वर्तुळात बोललं जायचं. वांद्रे व कुर्ला परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प तसंच सरकारी वाहनतळांचं काम डीबी रियाल्टीने केलं आहे. आणि यासगळ्यातून शाहिद बलवा यांची प्रतिमा डागाळलेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.