मंत्र्यांच्या मागे लागली ईडी, राज्यात रंगली राजकीय सापशिडी

मंत्र्यांच्या मागे ईडी लागल्याने राज्यात मात्र, राजकीय सापशिडी जोरदार रंगली आहे.

121

राज्यात सध्या ईडीच्या धाडी जोरदार सुरू आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. सध्या महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या चांगलेच रडावर असून, यामुळे महाविकास आघाडी आणि खासकरुन त्यांच्या मंत्र्यांची झोप उडाली आहे. आधीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडी लागलेली असताना, आता महाविकास आघाडीचे आणखी मंत्री देखील ईडीच्या रडावर येण्याची शक्यता आहे. याचमुळे सध्या महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसीला वाढला असून, राज्यात कोणत्याही क्षणी राजकीय भूकंप होण्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. त्याचमुळे मंत्र्यांच्या मागे ईडी लागल्याने राज्यात मात्र, राजकीय सापशिडी जोरदार रंगली आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका

एकीकडे ईडीचा वाढलेला तपास आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतली अंतर्गत धुसफूस यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. कधी महाविकास आघाडीचे निर्माते व शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांची घेत घेतात. तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट होते. एवढेच नाही तर नुकतीच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ईडी तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे राजकीय भविष्य यावर जोरदार चर्चा झाली. एवढेच नाही तर सध्या भाजपने आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला आहे. भाजपने अजित पवार यांची सीबीआय चौकशीचा प्रस्ताव आपल्या कार्यकारणीत मांडला होता. एवढेच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी थेट अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.

(हेही वाचाः ईडीने न्यायालयात सांगितला वाझे-देशमुखांचा १०० कोटी वसुलीचा मार्ग !)

दादांवर ईडीची टांगती तलवार?

भाजपने सध्या अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले असून, अजित पवार देखील येत्या काही दिवसांत ईडीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत. अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई करत तो सील केला आहे. धक्कादायक म्हणजे, अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्याचमुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः मामाच्या साखर कारखान्यावर ईडीची कारवाई! अजित पवारांनी सोडले मौन!)

शिवसेना-राष्ट्रवादीची गुप्त बैठक

सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरू झाल्या असून, मंगळवारी तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली. पण या बैठकीत काँग्रेस नेत्यांना मात्र दूर ठेवण्यात आले होते. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय काय, याचा थांगपत्ता काँग्रेसला लागलेला नाही.

दवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत फासे?

भाजपच्या देखील बैठकांवर बैठका सुरु झाल्या असून, भाजपने ऑपरेशन लोटसच्या दिशेने पाऊल तर टाकलेले नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते.

(हेही वाचाः महाविकास आघाडीला वाटते गुप्त मतदानाची भीती?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.