Assembly Election 2024 : कुर्ला विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेना की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला

238
Assembly Election 2024 : कुर्ला विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेना की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील कुर्ला विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर हे पुर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरणार असले तरी या मतदारसंघात उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातच जोरदार स्पर्धा आहे. सन २००९नमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले आणि त्यानंतर सातत्याने निवडणुकीत कुडाळकर यांच्याकडून पराभूत होणारे मिलिंद कांबळे यांच्याकडून या जागेसाठी जोरदार हट्ट केला जात आहे. मात्र, दुसरीकडे उबाठा शिवसेनेकडून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर आणि अश्विन मलिक यांच्यात चढाओढ असून पक्षातील अंतर्गत वादावर पडदा पाडण्यासाठी उबाठा शिवसेनेकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडली जाण्याची शक्यता आहे.

कुला विधानसभा क्षेत्र हे एसी मतदारसंघ असून सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कांबळे यांनी तत्कालिन अखंड शिवसेनेचे मंगेश कुडाळक सात हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र निवडणूक लढूनही कुडाळकर हे १२ हजार मतांनी विजयी झाले होते. तर भाजपाचे विजय कांबळे यांना सुमारे २९ हजार मते मिळवता आली होती, तर एआयएमआयएमचे अविनाश बर्वे यांना २५ हजार आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे मिलिंद कांबळे यांना १४ हजार मते मिळवता आली होती. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – बेस्टमध्ये खासगी बसेसची सेवा घेण्याचा आमचा प्रयत्न फसला; UBT Shiv Sena च्या सुहास सामंतांनी केले मान्य)

तर सन २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना भाजपाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांना ५५ हजार मते तर राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे यांना ३४ हजार मतदान झाले. त्यामुळे कुडाळकर यांनी कांबळे यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे आता उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी असल्याने ही जागा शिवसेनेची असली तरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली जाण्याची शक्यता आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव पत्करणारे मिलिंद कांबळे हे उबाठा शिवसेनेच्या जोरावर कुडाळकर यांना टक्कर देऊ शकतात. त्यामुळे कांबळे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा उबाठा कडून आपल्याकडे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

या मतदार संघात उबाठा शिवसेनेकडून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर आणि अश्विन मलिक यांच्या नावाची चर्चा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)यांच्याकडून मिलिंद कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुर्ला विधानसभेतून महायुतीचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांना ५८,५५३ मतदान झाले, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांना ८२, ११७ मतदान झाले होते. लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अधिक मतदान झाल्याने उबाठा शिवसेनेकडून तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या विधानसभेत प्रबळ दावा मानला जात असला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत या जागेचा तिढा कसा सोडवला जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – न्यायमूर्तींच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, CJI D Y Chandrachud यांचा मोठा निर्णय)

मागील तीन निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी

सन २००९ : मिलिंद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस

सन २०१४ : मंगेश कुडाळकर, शिवसेना

सन २०१९ : मंगेश कुडाळकर, शिवसेना

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.