आमदार झिशानचे पहिले ट्विट; उलगडणार Baba Siddique यांच्या हत्येचे गुपित ?

98
आमदार झिशानचे पहिले ट्विट; उलगडणार Baba Siddique यांच्या हत्येचे गुपित ?
  • प्रतिनिधी 

‘माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण करताना आपला जीव गमावला आहे. आज माझे कुटुंब कोलमडून पडले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे.’ असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचा आमदार मुलगा झिशान सिद्दीकी याने त्याच्या एक्स खात्यावर पोस्ट केले आहे. झिशान यांच्या ट्विटमुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या वादातून (एसआरए) झाल्याचे स्पष्ट होत आहे.

देशातील सर्वात महागड्या रिअल इस्टेट मायक्रो मार्केटपैकी एक असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर या दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना आमदार झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे मागील सहा ते आठ महिन्यांपासून विरोध करत होते. या ठिकाणी आमदार झिशान सिद्दीकी यांनी आंदोलन केले होते, तसेच येत्या काळात वांद्रे पूर्व येथे मोठे आंदोलन देखील करण्यात येणार होते. संत ज्ञानेश्वर नगरच्या पुनर्विकास करणाऱ्या कंपनीत २G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील शहिद बलवा यांनी मोठी गुंतवणूक केली आहे, त्याचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सिद्दीकी पितापुत्राच्या या आंदोलनामुळे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट रखडत चालला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात आमदार झिशान यांनी झोपडपट्टी वसाहतीचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेले सरकारी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्यापासून रोखले आणि अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणला होता. या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात आमदार झिशान सिद्दीकीवर सरकारी कामत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता.


(हेही वाचा – Lawrence Bishnoi Gang चा महाराष्ट्र कमांडर शुभु लोणकर?)

त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर तीन मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळ्या झाडून हत्या केली होती. आमदार मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडताच ही घटना घडली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने संपूर्ण मुंबई हादरून गेली आहे. याप्रकरणी तपास करत असलेल्या गुन्हे शाखेने गुरमेल सिंग (२३), धर्मराज कश्यप (१९) प्रवीण लोणकर (२८) आणि हरिशकुमार निशाद (२६) यांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेने अटक केलेले आरोपी हे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत. पण, बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याच दरम्यान, वडिलांच्या हत्येनंतर बुधवारी सायंकाळी पाच वाजता आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसलकर आणि गुन्हे शाखेच्या सह आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास ही भेट चालली. यावेळी आमदार झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्याकडील माहिती सह आयुक्त लखमी गौतम यांना दिली होती.

आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसलकर यांची भेट घेतली. त्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी सूचक प्रतिक्रिया असलेले ट्विट त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट केले आहे. दरम्यान, याप्रकरणात गुन्हे शाखेकडून लवकरच आमदार झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंद करण्यात येणार आहे. जबाबात ते पोलिसांना काय माहिती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मात्र आमदार झिशान यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सुरू झाली, कुठेतरी बाबा सिद्दीकी यांच्या (Baba Siddique) हत्येमागे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर या दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचा वाद असल्याचे या ट्विटचा अर्थ काढण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.