अभय योजनेला आणखी तीन महिन्यांचे अभय! मुंबईकरांना दिलासा

109

पाण्याच्या देयकांची रक्कम नियोजित वेळेत न केल्यास महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आकार लावला जातो. त्यामुळे या अतिरिक्त आकाराबाबत जलजोडणी धारकांना विशेष सूट देण्यासाठी मागील वर्षापासून अभय योजना राबवण्यात आली होती. ही अभय योजना आणखी तीन महिन्यांनी वाढवून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवून देण्याचे निर्देश स्थायी समितीने दिले आहेत.

दोन वेळा वाढवली मुदत

मुंबई महापालिकेच्यावतीने क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचे अधिदान हे जलदेयकाच्या दिनांका पासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक असून, एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. परंतु या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्‍यासाठी ‘अभय योजना’ ही वर्ष २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२० ही या योजनेची अंतिम तारीख होती. मात्र या योजनेला प्राप्त होत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, या योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु ही मुदत पुन्हा एकदा वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात आली होती.

(हेही वाचाः मुंबईतील मतदान केंद्र ५० टक्क्यांनी वाढणार! निवडणूक विभागाच्यावतीने सर्वेला सुरुवात)

पुन्हा कालावधी वाढवणे आवश्यक

ही मुदत संपुष्टात आल्याने विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी कोविड काळामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही, त्यामुळे ही मुदतवाढ अजून वाढवण्यात यावी आणि ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ही मुदतवाढ देण्याची मागणी रवी राजा यांनी स्थायी समितीत केली. दुसऱ्या लाटेनंतर लोकांना या देयकांची रक्कम भरता आलेली नाही, त्यामुळे तीन महिन्यांचा कालावधी वाढवून देणे आवश्यक आहे.

नगरसेवकांची मागणी

या मागणीला आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी पाठिंबा देत याबाबत आपण अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) पी. वेलरासू यांना पत्र देऊन ही मागणी केल्याचे सांगितले. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही अभय योजना वाढवून देण्याची गरज असून, सध्या निर्बंध असल्याने लोकांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे या सूचनेचा विचार प्रशासनाने करावा, असे त्या म्हणाल्या. यावेळी भाजपच्या कमलेश यादव यांनीही या चर्चेत भाग घेत अभय योजना वाढवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावर समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अभय योजना पुढील तीन महिन्यांकरता वाढवून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

(हेही वाचाः अखेर सोसायट्यांमध्ये होणाऱ्या लसीकरण मोहिमांसाठी नियमावली तयार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.