कोणे एकेकाळी जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या भारताला पुन्हा एकदा त्या स्थानापर्यंत पोहोचवायचे असेल तर भारतीय अध्यात्माची, त्यातील भक्तीतून येणाऱ्या शक्तीची वासुदेवानंद सरस्वती यांच्यासारख्या थोर विभूतींची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी केले.
बडोदा येथील परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे राष्ट्रीय अधिवेशन पावस येथे आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी झाले. त्यावेळी नाईक (Shripad Naik) बोलत होते. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. नाईक पुढे म्हणाले की, उज्ज्वल आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या भारतीय संतांचा विचार संकुचित नव्हता. स्वतःपुरते पाहायची त्यांची वृत्ती नव्हती. जगाचे कल्याणच त्यांना अभिप्रेत होते. ज्ञानाच्या बाबतीत ते सर्वश्रेष्ठ होते. म्हणूनच जगभरात भारताचे स्थान सर्वोच्च होते. भक्तीतून शक्ती देण्याचे मोठे काम भारतीय संतांनी केले. वासुदेवानंद सरस्वती ही त्यातील एक थोर विभूती आहे. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे समाज प्रबोधनाचे कार्य वासुदेवानंद सरस्वती प्रबोधिनी करत आहे. स्वामींच्या वाङ्मयाचा अधिकाधिक अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी नव्या पिढीने पुढे आले पाहिजे.
(हेही वाचा – Baba Siddique यांच्या हत्येसाठी मागण्यात आले होते १ कोटी)
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे विश्वस्त अमर देसाई यांनी मंडळाच्या सेवाकार्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी टेंब्ये स्वामींच्या ग्रंथसंपदेचा प्रसार करण्यासाठी आपल्या स्वायत्त महाविद्यालयामार्फत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्रिपदी परिवाराचे बाबासाहेब तराणेकर यांनी सांगितले की, आदिशंकराचार्यांनंतर देशभरात पायी प्रवास आणि ग्रंथसंपदा निर्माण करणारी टेंब्ये स्वामींसारखी दुसरी विभूती गेल्या दोन हजार वर्षांत झालेली नाही. शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी टेंब्ये स्वामींना दत्तस्वरूप असल्याचे म्हटले होते. यावरूनच त्यांची महती पटते. त्यांनी केलेल्या २३ चातुर्मास्यांच्या स्थळांचा जीर्णोद्धार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माणगाव (ता. कुडाळ) येथे १८५४ साली जन्मलेले आणि गरुडेश्वर (गुजरात) येथे समाधी घेतलेले दत्तावतारी टेंब्ये स्वामी यांनी आपल्या साठ वर्षांच्या आयुष्यात संस्कृत आणि मराठी भाषेत प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली. तिचा प्रसार व्हावा, या उद्देशाने २००२ साली बडोदा येथे प्रबोधिनीची स्थापना झाली. प्रबोधिनीमार्फत गेली १९ वर्षे स्वामींच्या साहित्याविषयीच्या चर्चेसाठी अधिवेशन आयोजित केले जाते. विसावे अधिवेशन पावस येथे सुरू झाले. प्रबोधिनीच्या विश्वस्त डॉ. श्वेता जेजुरकर यांनी प्रास्ताविकात प्रबोधिनीविषयीची माहिती दिली. नितीन देशपांडे यांनी प्रबोधिनीचे वृत्तकथन केले. (Shripad Naik)
उद्घाटनानंतर झालेल्या सत्रामध्ये बोरिवलीचे हेमंत करंदीकर यांनी टेंब्ये स्वामींच्या संन्यासाश्रमापर्यंतच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. पुण्याच्या वासुदेव निवासाचे प्रकाश पुजारी यांनी टेंब्ये स्वामींच्या त्रिशती काव्याची साहित्यिक शैली आणि वैशिष्ट्ये विशद केली. समारंभाला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यातून दीडशेहून अधिक आध्यात्मिक वाङ्मयप्रेमी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community