Baba Siddique यांच्या हत्येला राजकीय रंग देण्याची घाई नको

124
  • प्रवीण दीक्षित

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे पूर्वी आमदार होते. काही काळ ते मंत्री होते. सुरुवातीला ते काँग्रेस पक्षामध्ये होते. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार या गटामध्ये होते. त्यांचा काही मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला, त्यामुळे राजकीय हत्या का होतात आणि त्यासाठी काय आवश्यकता आहे? हे पाहणे आवश्यक आहे.

का झाली हत्या?

अशा हत्या होणार नाहीत, यासाठी काय प्रयत्न करावेत याची चर्चा करणे आवश्यक आहे, ही हत्या राजकीय होती किंवा नाही, हा मूळ प्रश्न आहे, कोणत्या हत्येला राजकीय म्हणायचे हे सुद्धा या निमित्ताने तपासणे गरजेचे आहे. उपलब्ध सर्व माहितीप्रमाणे असे दिसते की, एसआरए डेव्हलपमेंट प्लॅनचा एक मोठा जमिनीचा तुकडा एका प्रसिद्ध बिल्डरला शासनाने डेव्हलपमेंट करण्यासाठी दिलेला असतानाही बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी तो बळजबरीने आपल्याकडे हिसकावून घेतलेला होता. असे म्हटले जाते की, त्याचा बदला घेण्यासाठी त्या प्रसिद्ध बिल्डरच्या सांगण्याप्रमाणे दिल्लीतील कुप्रसिद्ध टोळी आहे, त्या टोळीचा प्रमुख विश्नोई याने मारेकऱ्यांच्या मार्फत बाबा सिद्दीकींचा खून केला. हा विश्नोई सध्या अहमदाबाद तुरुंगात आहे. असे म्हणतात की, त्याने तुरुंगात असतानासुद्धा त्या हत्येची जबाबदारी आपल्यावर घेतलेली आहे. पोलिसांनी हत्या झाल्यानंतर काही वेळातच हत्या करणाऱ्यांपैकी दोघा जणांना पकडले आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांपैकी तिसऱ्याही व्यक्तीला शोधून काढलेले आहे, त्यालाही लवकरच अटक केली जाईल. हे जे दोन मारेकरी पकडले आहेत, त्यातील एक मारेकरी उत्तर प्रदेशातील आहे, दुसरा हरियाणाचा आहे. असे म्हटले जाते की, ही सुपारी देऊन केलेली हत्या आहे. या मारेकऱ्यांपैकी एकाचे नाव शिवशंकर आहे. तो गेले काही महिने पुण्याला राहत होता. त्याने पुण्यामध्ये दोन-तीन तरुणांना बोलावून त्यांची एकमेकांशी गाठभेट करून दिली आणि काय करायचे यासंबंधीची माहिती दिली होती.

(हेही वाचा BJP ने नवी मुंबईतील फूट वाचवली; ‘या’ आमदाराला पुन्हा दिली उमेदवारी)

पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे

त्याप्रमाणे ते मुंबईतील कुर्ला भागामध्ये महिन्याला १४-१५ हजार रुपये भाडे देऊन राहत होते आणि गेले जवळजवळ पंचवीस दिवस त्यांनी बाबा सिद्दीकी कुठे राहतात, कुठे जातात, काय करतात व जाण्या-येण्याची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर ते मुलाच्या कार्यालयासमोर उभे असताना गोळ्या झाडून हत्या केली. त्यातील एक गोळी ही त्यांच्या छातीतून आरपार गेली. बाकीच्या तीन गोळ्यांच्या पुंगळ्या तिथे आढळून आल्या आहेत. एकंदरीत त्या ठिकाणी ४-५ गोळ्या तरी मारलेल्या दिसतात. त्यामुळे बाबा सिद्दीकी जागच्या जागीच ठार झाले. बाबा सिद्दीकी आमदार असल्यामुळे, राजकीय नेता असल्यामुळे त्यांना धमकीचे पत्रही आले होते. त्यांना असलेल्या भीतीमुळे, धमकीमुळे त्यांना वाय ग्रेड सुरक्षा शासनाने दिली होती. या वाय ग्रेड सिक्युरिटीमध्ये एक बंदूकधारी पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर संरक्षणासाठी कायम असतो. आता प्रश्न असा आहे की, बाबा सिद्दीकी यांच्या जवळ शस्त्रधारी पोलीस असतानासुद्धा त्यांची हत्या कशी झाली, त्यामागे काय कारणे आहेत? मुख्य मुद्दा असा की, ज्यांना अशी धमकी मिळते, त्यांना शासनाने सशस्त्र पोलीस दिलेला असतो. त्यांनी पोलिसांच्या सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. जसे तुम्ही रोज एकाच रस्त्याने जायचे, एकाच वेळी जायचे, एकाच रस्त्याने परत यायचे किंवा त्याच वेळेला परत यायचे, एखाद्या विशिष्ट ठिकाणीच रोज जायचे, तीच गाडी वापरायची, हे जे सगळे प्रकार आहेत, त्याच्यामुळे तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या मारेकऱ्याला सहज तुमच्या सगळ्या सवयींची जवळून कल्पना येईल. म्हणून हे टाळणे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे त्यांनी एकदा तुमची पाहणी केली की, त्याने त्याचा प्लॅन बनवला असेल, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाते. त्यामुळे तो नक्कीच त्याचे टार्गेट पूर्ण करतो. त्याला ठार मारण्यात यशस्वी होत असतो. आता याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा असा की, याला राजकीय हत्या म्हणायची का?

असामाजिक तत्वांना राजकीय संरक्षण नकोच

त्यांच्याशी जमिनीचा वाद जोडलेला होता. शासनाने एका बिल्डरला जी जमीन विकासासाठी दिली होती, ती जमीन त्याला मिळू न देता केवळ राजकीय ताकदीच्या जोरावर हिसकावून घ्यायची, त्याप्रमाणे मनमानी करत राहणे अशा व्यक्तीला राजकीय व्यक्ती समजणे चुकीचे ठरेल. आज समाजात बळजबरी करणारे, दमदाटी करणारे, लोकांकडून पैसे उकळणारे आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी जमिनीच्या किंमती अब्जावधी रुपये असतात. अशा ठिकाणच्या जमिनी बळकावणे, अशी गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्ती आहेत. आपल्या या गैरकृत्यांना संरक्षण मिळण्यासाठी म्हणून जो कोणी पक्ष सत्तेत असेल त्या पक्षाशी जवळीक साधायची आणि प्रशासकीय यंत्रणेकडून आपल्याला संरक्षण मिळवायचं आणि त्याच्या आधारे समाजामध्ये वावरायचे, असे करतात. प्रशासकीय यंत्रणा ही त्यांच्या हाताखाली असल्यामुळे ती कुठल्याही प्रकारे त्यांच्या गैरकृत्यांविरुद्ध कारवाई करेल, याची शक्यता नसते. त्यामुळे अशाप्रकारे एक प्रशासकीय यंत्रणेच्या पलीकडे जाऊन कुठल्या तरी टोळ्यांचा वापर करून सुपारी दिली जाते आणि त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून ही राजकीय हत्या होती, असे म्हणणे फार वरवरचे आहे. आज महानगरांमध्ये विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी मधल्या काही काळामध्ये अनेक असामाजिक तत्वांनी राजकीय पक्षांचा आधार घेऊन प्रशासकीय संरक्षण मिळवलेले आहे. त्यांची ही संरक्षण वलय, कवचं दूर करून, जी असामाजिक तत्त्व कशी आहेत, त्यांची गैरकायदेशीर कृत्ये उघड करणे आवश्यक आहे. त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने आणि जो कोणी राजकीय पक्ष आहे त्यांनी निर्भीडपणे कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही हत्या राजकीय हत्या आहे, असे मी तरी म्हणणार नाही. यापुढे जाऊन असे सांगेन की, ज्या कुणाला अशा प्रकारे संरक्षक कवच मिळालेले असेल. त्यांनी शक्यतो पोलीस सांगतील, त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे कदाचित काही काळ ते वाचतीलही; परंतु त्यांच्या कृत्यांचा जाब त्यांचे वैयक्तिक वैरी कुठे ना कुठे विचारतात आणि काटा काढत राहतात यात शंका नाही. (Baba Siddique)

(लेखक माजी पोलीस महासंचालक आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.