राष्ट्रवादीचे पुण्यात महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन

केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल. अशा परिस्थितीत भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला.

127

सातत्याने सुरू असलेल्या महागाईवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नोटबंदी या केंद्र सरकारने लादलेल्या कृत्रिम आपत्तीमुळे आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यातच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटकाही सामान्यांना बसत आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने योग्य धोरणे आखून सामान्यांना दिलासा दिला नाही, तर राजकीय पक्षच नव्हे, तर सामान्य जनताही रस्त्यावर उतरून भाजप नेत्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सत्तेवर येताच भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या असून, जनतेची दुर्दशा पाहण्यातच नेते समाधान मानत आहेत, असा आरोप शनिवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला. यावेळी आंदोलनकर्त्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावर चूल मांडून त्यावर चपात्या भाजल्या.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या महागाईवाढीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर ‘महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची भाषणे झाली.

(हेही वाचा : आता स्वत:च्याच मंत्र्यांवर शिवसेना आमदार नाराज!)

भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल करू!

गेल्या काही महिन्यांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. अत्यावश्यक गरज असलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत सहा महिन्यांत तब्बल १४० रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल प्रति लीटर १०५ रुपयांवर जाऊन पोचले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. एकीकडे नोटबंदीमुळे अनेकांना रोजगार गमवावे लागले आहे. त्यातच कोरोनासारख्या साथरोगाची भर पडली आहे. सामान्य जनतेला जीवन जगण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेला दिलासा देणारे धोरण स्वीकारणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु, सामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या आणि केवळ धनदांडग्यांचे हितसंबंध जोपासणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून सामान्यांना आणखी अडचणीच्या खाईत लोटण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याचा निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल. अशा परिस्थितीत भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.