Congress : मविआमध्ये फूट पडणार? सर्व घटक पक्षांमधील मुख्यमंत्रीपदाची लालसा आघाडीत करणार बिघाडी

मविआमध्ये काँग्रेसचे ना उबाठासोबत भावनिक नातेसंबंध आहे ना राष्ट्रवादीसोबत, काँग्रेसचा (Congress) केवळ वापर करण्यासाठी होत असलेला मविआतील अनुभव लक्षात घेऊन आता काँग्रेसने अस्तित्व दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

207
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटप निश्चित झाले आहे. मात्र अजून महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यामध्ये काँग्रेस (Congress), उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या तिन्ही घटक पक्षांतील मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंमधील मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा 

निवडणूक घोषित होण्याच्या आधीच उबाठाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी होऊ लागली होती. त्याच वेळी काँग्रेसने (Congress) याला पहिला विरोध केला होता. ‘युतीतील अनुभव लक्षात घेता ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री’, असे धोरण ठेवल्यास पाडापाडीचे राजकरण होते, असे कारण उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र हे केवळ वरवरचे कारण होते, उबाठाचे उद्धव ठाकरे यानांच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, असा सुप्त हेतू होता. मात्र काँग्रेसने (Congress) ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री या धोरणावर कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेस जागा वाटपाच्या वेळी उबाठाला अडचणीत आणण्याचे धोरण स्वीकारले आहे.

नाना पटोले यांची मुख्यमंत्री पदासाठी धडपड 

दुसरेकडे काँग्रेसलाही (Congress) मुख्यमंत्री पदाची लालसा लागली आहे. मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत आहे. अशा वेळी जास्त आमदार निवडून आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवण्याचे स्वप्न काँग्रेसला पडू लागले आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच काँग्रेसमधील काही गट नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी इच्छूक आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच आहेत. त्यामुळे ते जागा वाटपामध्ये मनातील मुख्यमंत्री पदाची लालसा बाळगून चर्चेला बसत असल्याने उबाठाची अडचण होत आहे. या सगळ्या वादात विदर्भातील जागा वाटपावरून वाद असल्याचे वरवरचे कारण दिले जात आहे.

शरद पवारांच्या मनात दुसराच मुख्यमंत्री 

तिसरीकड़े राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्येही मुख्यमंत्री पदाची लालसा वाढली आहे. शरद पवारांनी तर जाहीरपणे जयंत पाटील यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी टाकायची आहे, असे जाहीर सभेत घोषित केल्याबरोबर कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना भावी मुख्यमंत्री अशी घोषणा करणे सुरु केले. तर राजकीय वर्तुळात शरद पवार यांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. राज्यात पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री बनवल्यास कुणाचीही अडचण येणार नाही, असे शरद पवारांचे गणित आहे.

निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा कॉँग्रेसचा डाव  

एकंदरीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमधील मुख्यमंत्री पदाची लालसा ही मविआमध्ये फूट पाडण्यास कारणीभूत ठरणार आहे. या सगळ्यात काँग्रेसचे पक्के गणित ठरले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) चौथ्या क्रमांकावर होती, मात्र मविआची स्थापना झाली आणि काँग्रेस सत्ताधारी पक्ष बनला. मागील पाच वर्षांत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांत फूट पडली आणि विधानसभेत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर बनला आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मविआमध्ये काँग्रेसचे (Congress) सर्वाधिक खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसची ताकद वाढली आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणूक जर स्वबळावर लढवली, तर जास्तीत जास्त आमदार निवडून आणून निवडणुकीच्या नंतर एकत्र येऊन मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा विचार काँग्रेसचा असावा, अशी चर्चा आहे. मविआमध्ये काँग्रेसचे ना उबाठासोबत भावनिक नातेसंबंध आहे ना राष्ट्रवादीसोबत, काँग्रेसचा (Congress) केवळ वापर करण्यासाठी होत असलेला मविआतील अनुभव लक्षात घेऊन आता काँग्रेसने अस्तित्व दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.