- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) लक्ष आता आहे ते ९० मीटरच्या भालाफेकीवर. मागची चार वर्षं तो त्यासाठी प्रयत्न करतोय. पण, दुखापतीमुळे हे लक्ष्य साध्य होऊ शकलेलं नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करताना ८९.४५ मीटरची भालाफेक केली. पण, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९३.१२ मीटरची भालाफेक करत सुवर्ण आपल्या नावावर केलं. आणि नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
मधल्या काळात हात आणि जांघेचा स्नायू दुखावल्यामुळेही नीरज हैराण होता. पण, आता नवीन हंगामापूर्वी नीरजला (Neeraj Chopra) पुरेशी विश्रांती मिळाली आहे. तो ९० मीटरच्या फेकीसाठी सरावही करतो आहे. एका कार्यक्रमासाठी लखनौला आला असताना नीरजने शहराशी निगडित काही आठवणी सांगितल्या. आणि तो शहरात पुन्हा पुन्हा का येतो तेही सांगितलं. ‘लखनौ शहराचा माझ्या कारकीर्दीत खूप मोठा वाटा आहे. मी आयुष्यातील पहिलं सुवर्ण २०१२ साली ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत इथंच मिळवलं होतं. त्यामुळे टोकयोत सुवर्ण मिळाल्यावर मी आपुलकीने इथे परत आलो. आताही मला इथं यायचंच होतं,’ असं नीरज म्हणाला.
(हेही वाचा – Gadchiroli मध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार माओवादी ठार! धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ)
आणि शहराबद्दल बोलत असतानाच त्याने आपला पुढील हंगामाचा कार्यक्रम आणि उद्दिष्टही मीडियाला सांगितलं. ‘टोकयोतील यशानंतर पॅरिसमध्येही देशवासीयांना माझ्याकडून सुवर्णाचीच अपेक्षा होती. खुद्द मलाही सुवर्ण शक्य वाटत होतं. पण, दुखापतींची काळजीही वाटत होती. दुखापतीमुळे मी स्वत:ला जास्त तोशीष देऊ शकत नाही. मला लवकरात लवकर ९० मीटरचं लक्ष्य पूर्ण करायचंय. पण, दुखापत सध्या मला मागे खेचत आहे. मला सरावही मनासारखा करता येत नाहीए,’ असं नीरज म्हणाला. दुखापत असतानाच नीरजने (Neeraj Chopra) डायमंड्स लीग, आशियाई क्रीडास्पर्धा आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण हे आपलं ध्येय असल्याचं नीरजने सांगितलं आहे.
मध्यंतरी नीरजचे (Neeraj Chopra) प्रशिक्षक बदलले आहेत. त्यावरून काही काळ वादही निर्माण झाला होता. क्लाऊस बार्टिनेझ यांना भारतात राहायचं नव्हतं असं मीडियाने पसरवलं. पण, त्यावर नीरजने स्पष्टीकरण दिलं, ‘बार्टिनेझ ७५ वर्षांचे होते. आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम थकवणारा आहे. त्यांना उर्वरित वेळ आपल्या कुटुंबीयांबरोबर घालवायचा आहे. त्यामुळे त्यांनी घरी परतणं स्वाभाविक होतं,’ असं नीरज यावर म्हणाला. २०३६ चं ऑलिम्पिक आयोजन भारतात करण्याच्या मोहिमेला आपला पाठिंबा असल्याचं त्याने सांगितलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community