विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा खूपच वाढला आहे. काँग्रेस (Congress) आणि उबाठामध्ये विदर्भातील जागांवरून जो वाद वाढला आहे, तो महाविकास आघाडी फुटेपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे अखेर काँग्रेस हायकमांडने राज्यातील जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी नाना पटोले यांना बाजूला करून त्याजागी बाळासाहेब थोरात यांना जबाबदारी दिली आहे. मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी उबाठासोबत काँग्रेसची जागा वाटपावर बैठक होणार आहे, मात्र जर काँग्रेसने विदर्भात माघार घेतली तर काँग्रेसला मुख्यमंत्री पद विसरावे लागू शकते.
विदर्भामुळे काँग्रेसला मविआत वरचष्मा राखता येणार
महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा वाद किरकोळ 4 – 6 जागांवरचा विषय उरलेला नसून शिवसेनेने विदर्भातल्या जागांवर दावा सांगून जी ‘राजकीय मेख’ मारून ठेवली आहे, तिचे भविष्यकालीन परिणाम लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी सध्या ताणून धरल्याचे चित्र दिसत आहे. कारण जागावाटपाचा संबंध संख्याबळाशी आणि संख्याबळाचा संबंध थेट मुख्यमंत्री पदाच्या दाव्याशी आहे. विदर्भातल्या 62 जागा म्हणजे काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे. त्या 62 जागांच्या बळावर काँग्रेसला महाविकास आघाडीत वरचष्मा राखता येणार आहे. आघाडीत ज्याचे संख्याबळ जास्त, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरले, तर काँग्रेस विदर्भावरच मदार ठेवून नंबर 1 चा पक्ष ठरू शकते. हे महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना निश्चित माहिती आहे. पण शिवसेनेने तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे. अशा स्थितीत ‘नंबर गेम’ मध्ये काँग्रेस पेक्षा मागे पडू नये म्हणून शिवसेनेने स्वतःचा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण हा बालेकिल्ला वगळून आपली ताकद नसलेल्या विदर्भात काँग्रेसच्या (Congress) बालेकिल्ल्यावर दावा सांगितला आहे. यातून शिवसेनेचे बळ वाढेल की नाही हा भाग अलहिदा, पण काँग्रेसचे संख्याबळ मात्र घटून शिवसेना आणि काँग्रेस हा सामना मुख्यमंत्री पदाच्या दृष्टीने बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community