महाविकास आघाडीचे जागावाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु असतानाच मविआमधील एक एक करत छोटे पक्ष मविआला सोडून जाऊ लागले आहेत. समाजवादी पक्षानंतर आता शेकापनेही मविआची साथ सोडली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मविआच्या उमेदवाराला फटका बसणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाने ५ उमेदवार जाहीर केले आहेत. मागील अनेक दिवसांपासून मविआ नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. परंतु जागावाटपात तिन्ही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर वाद होत आहेत. मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल आणि सांगोला येथील उमेदवार जाहीर केले. त्यात अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे, उरण प्रीतम म्हात्रे, पनवेल बाळाराम पाटील, सांगोला बाबासाहेब देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे. (Assembly Election)
(हेही वाचा Assembly Election च्या काळात सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणा सजग, संशयास्पद प्रकरणी थेट जप्तीची कारवाई)
अलिबाग येथील शेतकरी भवनात शेकापची बैठक झाली. त्यात ५ उमेदवारांचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीत सांगोल्यासह काही जागांवर शेतकरी कामगार पक्षाने दावा केला होता. मात्र सांगोला येथे विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने ती जागा ठाकरे गटाला दिली. याठिकाणचे आमदार शहाजी पाटील हे शिंदेसोबत गेले असले तरी ही जागा सोडण्यास ठाकरे गटाने नकार दिला. या जागेवर इच्छूक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे यांना उद्धव ठाकरे यांनी प्रवेश दिल्याने शेकाप नाराज झाला. शेकापच्या नेत्यांनी यावर शरद पवारांची भेट घेतली, पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अलिबाग येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठक घेतली त्यामध्ये सांगोलासह ५ उमेदवार जाहीर करण्यात आले. (Assembly Election)
Join Our WhatsApp Community