BMC School : दहावीपर्यंतचे शिक्षण देत असताना स्पर्धा परीक्षांचेही शिक्षण

121
BMC School : दहावीपर्यंतचे शिक्षण देत असताना स्पर्धा परीक्षांचेही शिक्षण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

रोजच्या शिक्षणासह तंत्रशिक्षण, मोबाईलच्या सहाय्याने शिक्षण कसे देता येईल, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवे. दहावीपर्यंतचे शिक्षण देत असताना स्पर्धा परीक्षांचेही शिक्षण देण्यावर भर द्या. ठराविक कालावधीनंतर विद्यार्थ्यांचे, त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करा. हे करीत असताना त्यांच्या पालकांनाही याबाबत वेळोवळी माहिती द्या, अशा सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केल्या. (BMC School)

शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांची आढावा बैठक भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात २३ ऑक्टोबर २०२४) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून गगराणी बोलत होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदींसह शिक्षण विभागातील अधिकारी व सर्व मुख्याध्यापक या बैठकीस उपस्थित होते. (BMC School)

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये गुणवत्ता आहे. यासह व्यावसायिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये आपले विद्यार्थी आणखी पुढे कसे जातील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यावर भर देणे यासह शिक्षक-पालक संवाद आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. शिक्षक हाच विद्यार्थी आणि पालकांच्या सर्वाधिक जवळ असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका खूप मोलाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (BMC School)

(हेही वाचा – NCP Candidate List : राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या यादीत ६ नवे चेहरे; जाणून घ्या कोण आहेत ‘हे’ उमेदवार)

प्रगतीचा आलेख आणखी उंचवायला हवा

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्वे २०२१’ (NAS 2021) अहवालावर आधारित संगणकीय सादरीकरणाद्वारे बुधवारच्या बैठकीत सर्व शाखांतील मुध्याध्यापकांशी संवाद साधला. या सर्वेक्षणातील बारकाव्यांवर डॉ. सैनी यांनी प्रकाश टाकला. तसेच सन २०२५ मध्ये हे सर्वेक्षण पुन्हा होणार आहे. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचवायला हवा, असे आवाहन त्यांनी अधिकारी-शिक्षकांना केले. (BMC School)

वर्गात उपस्थिती वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या प्रगतीचा विचार करतानाच त्यापुढील उच्च शिक्षणाचा, स्पर्धा परीक्षांचा पायादेखील पक्का करण्यावर भर द्यावा, असेही डॉ. सैनी यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांचे गट तयार करून त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, नियमितपणे पालकांची सभा घेवून त्यांच्याशी शैक्षणिक संवाद वाढविणे, अभ्यासक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करणे, विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, अध्यापन पद्धतींमध्ये बदल घडविणे यांवरही अधिकारी आणि शिक्षकांमध्ये संवाद साधला.

याशिवाय ‘पॉक्सो’ कायद्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. सैनी यांनी ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्वे २०२१’ अहवालावर आधारित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील जमेची आणि सुधारणा गरजेची असलेल्या अशा दोन्ही बाजूंवर चर्चा केली. यामध्ये उपस्थित मुख्याध्यापक यांनी मत व्यक्त केले. (BMC School)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत तक्रार समित्या गठीत)

शिक्षण विभागाचे सन-२०२७ पर्यंतचे व्हिजन

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबई महानगरपालिका शाळांची माहिती, शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती याबाबत माहिती दिली. तसेच महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे सन – २०२७ पर्यंतचे व्हिजनही यावेळी मांडले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी प्रास्ताविक केले. बैठकीच्या सुरुवातीला अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांना मतदानाचा टक्का वाढीसाठीची शपथ देण्यात आली. (BMC School)

उपक्रमशील शिक्षकांनी केले मार्गदर्शन 

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील उपक्रमशील शिक्षिका वृषाली देसाई, स्वप्ना यादव, सविता जगताप, पूजा संख्ये, शिक्षक राजाराम जळके, उदय नांगरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबतही माहिती दिली. यामध्ये शिक्षक पालक सभा घेणे, शिक्षकांचे गट तयार करणे, विद्यार्थ्यांना पर्यावरणीय बदलांची माहिती देणे, शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग वाढविणे, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देणे आदी मुद्यांचा समावेश होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.