बोरिवलीत भाजपामध्ये उमेदवारीवरून तणाव; Gopal Shetty बंडखोरी करणार

170
भाजपाने सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली, त्यामध्ये बोरिवली येथून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. मात्र या उमेदवारीमुळे येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) नाराज झाले आहेत. ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. बोरीवलीच्या सन्मानासाठी मी अपक्ष लढणार, असे गोपाळ शेट्टी म्हणाले.

बोरिवली धर्मशाळा नाही 

माजी खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) म्हणाले की, मी सकाळपासून पक्षाच्या बैठकीत आहे. मी भाजपा विचारांना सोडले नाही. सोडणार नाही. अन्य पक्षात जाऊन काम करणार नाही. कार्यकर्ते आणि जनतेने जे काही ठरवले असून त्याचे पालन करणार. बोरिवली धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यात कुणीही कुठून लढू शकत नाही असे लिहिलेले नाही. परंतु स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते. पहिल्यांदा विनोद तावडेंना आणले, त्यानंतर सुनील राणेंना आणले, मी खासदार होतो लोकांना चालवून घेतले. मला बदलून पीयूष गोयल यांना आणले. तरीही मी गोयल यांच्या पाठीशी होतो. मात्र आता पुन्हा तसेच झाले.
संजय उपाध्याय हे चांगले कार्यकर्ते आणि पक्षासाठी काम केले यात शंका नाही, परंतु बोरिवली मतदारसंघात वारंवार अशाप्रकारे खेळ करणे बरोबर नाही. ज्या बोरिवलीने मला दिर्घकाळ नेतृत्वाची संधी दिली. मला सध्या लोकांची भावना जाणवते, तुम्ही जर आता लढले नाही तर येणाऱ्या ५० वर्षात कुणी लढणार नाही. बोरिवली मतदारसंघाचे आव्हान स्वीकारले नाही तर ५० वर्ष बोरिवलीचा अशाप्रकारे वापर केला जाईल. ज्या बोरिवलीने मला पुढे आणले त्या लोकांसाठी जे काही करणे मला शक्य आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे. कार्यकर्ते काय म्हणतात, बोरिवलीकर काय म्हणतायेत यावर मी निर्णय घेईन. पक्षाने आज जो निर्णय दिला त्यावर बोरिवलीकरांची नाराजी आहे. पक्षाचा निर्णय चुकीचा आहे. त्याविरोधात जे काही कार्यकर्ते भूमिका घेतील त्यानुसार मी पुढे पाऊल उचलणार असा इशाराच गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी दिला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.