Diwali 2024 : मशालींच्या उजेडात उजळला दुर्गराज रायगड

143
Diwali 2024 : मशालींच्या उजेडात उजळला दुर्गराज रायगड
Diwali 2024 : मशालींच्या उजेडात उजळला दुर्गराज रायगड

सोमवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो मावळ्यांनी वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर किल्ले रायगडावर उपस्थित राहत पहिला दिवा छत्रपती शिवरायांना अर्पण करत दिवाळीची जल्लोषात सुरुवात केली. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड (Raigad) संस्थेच्या वतीने सलग १३व्या वर्षी ‘शिवचैतन्य सोहळा’ साजरा झाला. याच संस्थेच्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीला शिवराजाभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. (Diwali 2024)

(हेही वाचा – Nana Patole यांनी तिकिटे विकली; काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांचा आरोप)

देशभर दिवाळीचा जल्लोष सुरु असताना किल्ले रायगडावर मात्र अंधार पसरलेला असतो. त्यामुळेच, ‘पहिला दिवा महाराजांच्या चरणी आणि त्यानंतर आपल्या घरी’, असा निश्चय करुन गेली अनेक वर्ष नित्यनेमाने राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्त किल्ले रायगडावर दीपोत्सव साजरा करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतात.

राज पुरोहित श्री प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रोपचाराने गडावरील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. गडदेवता शिरकाई, श्री जगदीश्वर, हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन यांचे पूजन स्वामींच्या शुभ हस्ते करण्यात आले. समितीचे संस्थापक सदस्य संजय ढमाळ हे यजमान म्हणून पूजेला बसले होते. सायंकाळी श्री शिरकाई देवीची पूजा केल्यानंतर ढोल-ताशांचा गजरात आणि मशालींच्या उजेडात छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक निघाली. होळीचा माळ आणि राजसदर येथे सर्वांनी दीपोत्सव साजरा केली. सोलापूर व पुणे येथील छोट्या शिलेदारांनी मशालींच्या प्रकाशात लाठी काठी आणि तलवारबाजीचे चित्तथरारक सादरीकरण केले. तसेच, बोरीवलीच्या मावळ्यांच्या पारंपरिक ढोल-ताशा पथकाने जबरदस्त वादनाने किल्ले रायगड दणाणून सोडला. नगारखाना येथे ‘इंद्र जिमी जंभ पर…’ या छंदावर सादर केलेल्या वादनाने उपस्थित शिवभक्त बेभान झाले. या सोहळ्यासाठी शेकडो उपस्थित शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती दर्शविली.

श्री जगदीश्वर मंदिर, भवानी कडा, राजसदर, महाराजांचे समाधीस्थळ, व्याडेश्वर मंदिर, बाजारपेठ, महादरवाजा, पाचाड येथील जिजाऊंचा वाडा अशा प्रमुख ठिकाणी रांगोळ्यांसह फुलांची सजावट करण्यात आली व दिवे लावण्यात आले. ‘ज्यांच्यामुळे आपण आज विविध सण साजरे करतो, त्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्यासाठीच, पहिला दिवा महाराजांच्या चरणी, त्यानंतर आपल्या दारी, असा निश्चय सर्वांनी करावा,’ आणि या चैतन्यदायी सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar) यांनी या प्रसंगी केले. (Diwali 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.