ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका डॉ. वीणा विजय देव (वय ७५) यांचे मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी पुण्यात निधन झाले. त्या दिवंगत लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्या पश्चात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. वीणा देव (Veena Dev) यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९४८ झाला होता.
गो.नी. दांडेकर यांच्यामुळे त्यांच्यावर घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. पुढे १९६७ मध्ये त्यांचा विवाह डॉ. विजय देव यांच्याशी झाला. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले. विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. वीणा देव (Veena Dev) लेखन, संकलन आणि संपादन असे विविध साहित्यप्रकार लीलया हाताळले. त्यांचे ‘कधीकधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्रीरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वान्सीचे दिवस’ हे लेखसंग्रह, ‘स्मरणे गोनिदांची’ हा स्मरणग्रंथ आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. गो.नी. दांडेकर यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकास राज्य सरकारचा उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community