- सचिन धानजी, मुंबई
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून झिशान सिद्दीकी आणि महायुतीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्यात प्रमुख लढत असली तरी या दोघांसमोर मनसेच्या तृप्ती सावंत आणि अपक्ष उमेदवार कुणाल सरमळकर यांचे प्रमुख आव्हान आहे. या मतदारसंघामध्ये मनसेचे परंपरागत सरासरी दहा हजार मतदार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपाने काही जागांवर मनसेला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपाची सरासरी २५ हजारांहून अधिक मतदार असल्याने तृप्ती सावंत यांच्यामुळे या मतदार संघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. (Bandra East Assembly)
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात २००९ पासून शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत हे निवडून येत होते, परंतु सन २०१४ मध्ये ते निवडून आल्यानंतर त्यांचे निधन झाले अणि याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत या उभ्या राहिल्या आणि तत्कालिन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर सन २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांचा पत्ता कापून दिवंगत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत तब्बल २४ हजार ७१ मते मिळवली. तर शिवसेनेचे महाडेश्वर यांचा ५ हजार ७९० मतांनी पराभव झाला आणि काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी ३८ हजार ३३७ मते मिळवत हा विजय मिळवला होता. त्यामुळे या निवडणुकीत तृप्ती सावंत यांना १९ टक्के मतदान झाले होते. (Bandra East Assembly)
(हेही वाचा – Mankhurd-Shivajinagar Constituency : उबाठा-काँग्रेसचे उमेदवारी अर्ज बाद)
परंतु आगामी विधानसभा २०२४च्या निवडणुकीत ठाकरेंचे भाचे अर्थात उबाठा शिवसेनेच्या युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार हे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. त्यातच त्यांचे वडिल माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा खून झाल्याने त्याची सहानूभूती ही त्यांच्या पाठिशी आहे. एका बाजूला वरुण सरदेसाई यांच्याकडे शिवसेनेची सरासरी ४० हजार मते तसेच काँग्रेसची सुमारे १२ हजार मते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सुमारे आठ ते दहा हजार एवढ्या मतांची मोट असली तरी झिशान सिद्दीकी यांच्याकडे मागील वेळेस मिळालेल्या ३८ हजार मतांच्या तुलनेत सरासरी ३२ हजार मते ही काँग्रेसची आहे. शिवाय शिवसेनेची काही मते असल्याने शिवसेनेच्या एकूण ४० हजार मतांचे विभाजन होईल. तसेच काँग्रेसेच्या मतांचेही विभाजन होईल. त्यामुळे वरुण सरदेसाई आणि मोहम्मद झिशान सिद्दीकी यांच्या मतांचे विभाजन होणार असल्याने दोघांमध्ये चुरसीची लढत होणार आहे. (Bandra East Assembly)
परंतु झिशान सिद्दीकी यांच्यासोबत पटत नसल्याने शिवसेनेचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत एकप्रकारे वरूण सरदेसाईला प्रत्यक्ष मदत केली आहे. मात्र, युती असली तरी झिशान सिद्दीकींचा प्रचार करण्यात अडचणी असल्याने मनसेच्यावतीने तृप्ती सावंत या निवडणूक रिंगणात उतरल्याने भाजपाचे मतदान तृप्ती सावंत यांना होऊ शकते. माजी आमदार बाळा सावंत यांची पत्नी असल्याने विभागातील लोकांची त्यांना मिळणारी वैयक्तिक मते, मनसेची मते आणि भाजपाची मते या जोरावर सावंत या वरूण सरदेसाई आणि झिशान सिद्दीकीची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे. त्यातच बसपाचे अजय कापडणे हेही निवडणूक रिंगणात असल्याने या मतदारसंघात कुणालाही विजयाचा मार्ग सहज सोपा नाही. मात्र, वरुण सरदेसाई यांना निवडून आणण्याचे आव्हान हे ठाकरे कुटुंबासमोर असून या तिघांच्या लढ्यात कुणाचा विजयाचा झेंडा फडकतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Bandra East Assembly)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community