एकाच जातीवर लढणे शक्य नाही, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. कुणालाही पाडा, कुणालाही निवडून आणा. निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो, तरी खेळ खल्लास, बाहेर राहिलो, तरी खेळ खल्लास. आपल्याला आता निवडणूक लढवायची नाही. याला पाड, त्याला पाड, ही आपली भूमिका नाही, असे मनोज जरांगे यांनी घोषित केले आहे. तसेच मराठा आंदोलकांनी अर्ज मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा – Rohit Patil यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळातून वाटली ३००० रुपयांची पाकिटे; गुन्हा दाखल)
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सरकारला वेठीस धरतांना मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणी मराठा समाज प्रबळ आहे, तिथे स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली होती. तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना पाडणार असल्याचेही त्यांनी घोषित केले होते. त्यानंतर आता अचानक यू टर्न घेत त्यांनी निवडणूक रिंगणातून सपशेल माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. आमचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. कोणालाही समर्थन दिलेले नाही, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले की, मी मतदारसंघ ठरवले आहेत. उमेदवारांची नावे ठरवणे फक्त बाकी आहे. मित्र पक्षांकडून अजून यादी आलेली नाही. एका जातीवर निवडून येणे शक्य नाही. ही माघार नाही, हा गनिमी कावा आहे. आमचे आंदोलन सुरुच रहाणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला, असे जरांगे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community