मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी; Ashish Shelar यांचे आव्हान

77
मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी; Ashish Shelar यांचे आव्हान

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसने मुंबईत जे अकरा उमेदवार दिले आहेत त्यातील केवळ दोनच उमेदवार मराठी आहेत. इतका पराकोटीचा मराठीद्वेष दाखवणाऱ्या काँग्रेसबद्दल आपली भूमिका काय आहे, हे स्पष्ट करा, असे आव्हान मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना सोमवारी दिले. भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. शेलार बोलत होते. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते.

ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले की, या निवडणुकीत काँग्रेसने मराठी चेहरे डावलत वरिष्ठ मराठी नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी, महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य होऊ देणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका होती. आंदोलक मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या गेल्या. १०६ मराठी माणसे हुतात्मा झाली. आताही तीच मराठीद्वेष्टी भूमिका घेत काँग्रेसने मराठी माणसांना उमेदवारी डावलल्याकडे ॲड. शेलार यांनी लक्ष वेधले.

(हेही वाचा – Assembly Election : महायुतीच्या १२ तर मविआच्या ९ बंडखोरांनी घेतली विधानसभेतून माघार)

या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी मुख्य लढत आहे. राज्यातील महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि महायुतीच्या कारभाराची अडीच वर्षे अशी तुलना होणे स्वाभाविक आहे. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे स्थगितीचे वाहक आणि महायुती म्हणजे प्रगतीचे शिलेदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकांना निर्णय घेणे आता खूप सोपे आहे. सामना सोपा होत चालला आहे आणि महाराष्ट्रातील जनता आम्हालाच कौल देऊन महायुती सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी यावेळी व्यक्त केला.

जम्मू काश्मीरमध्ये नवे सरकार सत्तेत आल्यापासून तेथील हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारी, समाजकंटक, दहशतवादी या कायदा आणि सुव्यवस्थेला अडचणी आणणाऱ्या बाबी तेथे आल्या आहेत. कारण तेथे इंडी आघाडीचे सरकार सत्तेत आले. जोवर केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारचे नियंत्रण होते तेव्हा अशा घटना घडत नव्हत्या. महाविकास आघाडीतील पक्ष ज्या ज्या राज्यात जातात तेथे तेथे अशांतता, अस्थैर्य निर्माण होते. समाजकंटक, अतिरेकी असे घटक वाढतात. म्हणून महाविकास आघाडीला हद्दपार करा, असे आवाहन ॲड. शेलार यांनी यावेळी मतदारांना केले. ॲड. शेलार म्हणाले की, आघाडीतील घटक पक्ष याकूब मेमनचे समर्थन करतात. इब्राहीम मुसा हा बॉम्बस्फोटातील दोषसिद्ध आरोपी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रचार करतो. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना लागलेल्या गोळ्या या कसाबने झाडलेल्या नव्हत्या असे म्हणणाऱ्या प्रवृत्तीला दूर ठेवण्याची आवश्यकता आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मातोश्री पुढे आता सिल्वर ओकचे वजन वाढत आहे)

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या महायुती सरकारच्या हस्तक असल्याचा बिनबुडाचा आरोप करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सात दिवसांत पुरावे सादर करावे, अशी त्यांना आम्ही नोटीस पाठवणार आहोत. अन्यथा नाना पटोले यांच्यावर बेछुट, विनापुरावे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. एखाद्या शासकीय अधिकाऱ्यावर असे बेछूट आरोप करत त्यांना लक्ष्य करणे, त्यांचा छळ करणे हे अतिशय निषेधार्ह आहे. अशी भूमिका पुढे काँग्रेसला महाग पडू शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या मनासारखे झाले की निवडणूक आयोग निष्पक्ष आणि मनासारखे झाले नाही की पक्षपाती असे काँग्रेसचे धोरण आहे, त्यामुळे उद्या पराभव झाला की खोटे अश्रू ढाळू नका, असा टोलाही ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी काँग्रेसला लगावला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.