- ऋजुता लुकतुके
भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयार होत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिका पराभवामुळे भारतीय संघाचं मनोधैर्य खचलेलं असताना ही मालिका आणि ती ही परदेशात सुरू होत आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने कदाचित खेळणार नाहीए. त्याने आधीच तसं निवड समितीला कळवलं आहे. पण, आताची बदललेली परिस्थिती पाहता रोहितने आपली सुटी रद्द करावी आणि संघाबरोबर सुरुवातीपासून रहावं असं सुनील गावसकर यांना वाटतं. आणि हेच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहितला सांगावं असं सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सुचवलं आहे.
निदान कप्तानाच्या सहभागाविषयी स्पष्टता हवी, असं गावसकर (Sunil Gavaskar) यांचं म्हणणं आहे. ‘पहिली कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळायला हवी. तो तंदुरुस्त नसता तर ठिक होतं. पण, तसं नाहीए. पण, अशा खडतर मालिकेत कर्णधार पहिल्याच कसोटीत नसेल तर उपकर्णधारावरही त्याचं दडपण येऊ शकतं. आणि तसं होणं आता परवडणारं नाही,’ असं सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – उबाठाचे उमेदवार Sunil Raut यांना महिलेविषयीचे आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; गुन्हा दाखल)
आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) नेमका ऑस्ट्रेलियात कधी जाणार हे ही स्पष्ट नसल्यामुळे अख्ख्या दौऱ्यासाठीच जसप्रीत बुमराहला कर्णधार करावं अशी गावसकर यांची दुसरी सूचना आहे. ही जबाबदारी निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकरची आहे, असं गावसकर यांना वाटतं. ‘अजित आगरकरने रोहितला स्पष्ट सांगावं की, तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत कधीही सहभागी होऊ शकतो. पण, फक्त खेळाडू म्हणून. कारण, सध्या रोहित पहिली कसोटी खेळणार नाही, हे आपल्याला माहीत आहे. पुढील कसोटी खेळणार की नाही हे ठाऊक नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात खेळाडूंनी का रहावं? त्यापेक्षा जसप्रीत बुमराह अख्खी मालिका भारतीय संघाचं नेतृत्व करूच शकतो. आणि गोष्ट अजित आगरकरनेच सांगायला हवी,’ असं सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी निक्षून म्हटलं आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या ०-३ पराभवानंतर संघातील परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे एवढा कठोरपणा दाखवण्याची गरज असल्याचं गावसकर (Sunil Gavaskar) यांचं म्हणणं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community