गेल्या वर्षभराच्या कालावधीत कोकणासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचे दिसून आले नाही, कोकणातील अनेक प्रकल्प अपुरे असल्यामुळे कोकणाचा विकास थांबला असून प्रत्येक अधिवेशनात कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकार करत आहेत. वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची निर्मिती करा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सभागृहात केली.
सरकार गेंड्याच्या कातडीचे
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कोकणातील रखडलेल्या विकासासंदर्भातील समस्या सभागृहात मांडतांना सांगितले की, सतत केलेल्या मागणीनंतरही राज्य सरकारला जाग आली नाही. अर्थसंकल्प अधिवेशनात कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे, अशी मागणी केली असताना या संदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आला नसून हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
(हेही वाचा : शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्र्यांचे भन्नाट उत्तर! म्हणाले, ‘यांना’ सोडून कुठे जाणार?)
कोकणचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ३००० कोटी द्या!
दरेकर म्हणाले की, राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी असलेल्या वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि मराठवाडा, विदर्भातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींनी मांडलेली आहे. राज्यातील कोकणचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ३००० कोटी रुपये द्या. हा निर्णय तर सरकारने घ्यावाच, पण त्याबरोबरच वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या कोकणासाठी सुध्दा स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे, अशी आग्रही मागणी दरेकर यांनी केली.
Join Our WhatsApp Community