Assembly Election 2024 : मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या जागा धोक्यात?

234
Assembly Election 2024 : मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या जागा धोक्यात?
  • खास प्रतिनिधी 

सोमवारी ४ नोव्हेंबर या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणात प्रमुख लढती नक्की झाल्या. राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक लक्षवेधी लढत जर कोणती ठरेल तर ती दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन नातवांची. ते म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे. (Assembly Election 2024)

पूर्व-नियोजनाने पहिली निवडणूक सोपी

आदित्य ठाकरे यांची ही दुसरी निवडणूक असली तरी २०१९ प्रमाणे साधी-सोपी (cakewalk) ही निवडणूक नसेल. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी किमान सहा महिने आधी वरळी मतदारसंघाची चाचपणी करून निवड केली होती आणि त्यादृष्टीने पुढे पावलेही उचलली. पहिली निवडणूक असल्याने आदित्य यांनी कोणताही धोका (risk) पत्करला नाही. तत्कालीन स्थानिक शिवसेना आमदार सुनील शिंदे यांची मतदारसंघावर चांगली पकड होतीच, शिवाय दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार, विरोधी पक्षातील माजी आमदार आणि तत्कालीन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनाही शिवसेनेत घेतले. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मनसेची वरळीत ताकद असूनही ठाकरे घरातील पहिला व्यक्ती निवडणूक रिंगणात असल्याने मनसेने त्यांच्यासमोर उमेदवार दिला नाही. त्यानंतरच आदित्य यांनी निवडणूक रिंगणात उडी घेऊन सहज विजय मिळवला.

पुढे आश्वासन (commitment) दिल्याप्रमाणे सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून वर्णी लावली. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडाच्या दूतावासासमोर निदर्शने करू; Hindu Janjagruti Samiti चा इशारा)

मतदारसंघाकडे दुर्लक्ष

पण २०१९ नंतर पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. एका शिवसेनेचे दोन भाग झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस वरळीत तोंडी लावायलाही शिल्लक नाही. त्यामुळे आदित्य यांची ताकद अर्थाने कमी झाली. दुसरी गोष्ट अडीच वर्षे मंत्री असताना आदित्य यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले, अशी चर्चा आहे. त्यानंतर सत्ता गेली. परिणामी गेल्या पाच वर्षात वरळीकरांना आमदार केवळ टीव्हीवरच पाहता येत होता. वरळी बीडीडी चाळींमधील काही मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा केली. (Assembly Election 2024)

मनसेचा सक्रिय नेता

आता या निवडणुकीत शिवसेना उबाठाचे उमेदवार आदित्य यांच्या विरोधात मनसेने कंबर कसली आहे. मनसेचे मुंबईतील सर्वाधिक सक्रिय नेते आणि राज ठाकरे यांच्या ‘गळ्यातील ताईत’ संदीप देशपांडे निवडणूक रिंगणात आहेत. देशपांडे यांनी दोन महिने आधीच प्रचार सुरू केला आहे. तसेच संदीप देशपांडे घराघरात परिचित चेहेरा असल्याने त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. शिवसेना उबाठाचे नाराज मतदार मनसेकडे वळतील, अशी शक्यता अधिक आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – विकासद्रोही, राज्यद्रोही, धर्मद्रोही, जनताद्रोही मविआच्या नेत्यांना धडा शिकवा; Pravin Darekar यांचे आवाहन)

काँग्रेसची मते देवरांकडे?

शिवसेनेकडून (शिंदे) वरळी मतदार संघात मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वडील दिवंगत मुरली देवरा हे काँग्रेसचे अनेक वर्षे मुंबई अध्यक्ष राहिल्याने संपूर्ण मुंबईतील काँग्रेसमध्ये त्यांना आदराने पाहिले जाते. मिलिंद हेही माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार असून यांचेही व्यापारी वर्गात चांगली मैत्री आहे. त्यामुळे शिवसेना व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील काँग्रेसची मते देवरा यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे ‘अँटी-इन्कम्बन्सी’ (anti-incumbency), उबाठाची नाराज मते मनसेकडे वळणे आणि काँग्रेसची मते मिलिंद देवरा यांच्याकडे गेल्यास आदित्य ठाकरे यांची जागा धोक्यात येऊ शकते. (Assembly Election 2024)

पूर्व-नियोजनाचा अभाव

अमित ठाकरे यांनाही असाच मतविभागणीचा फटका बसला तर आश्चर्य वाटू नये. माहीम मतदारसंघातून अमित राज ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे तीन वेळा आमदार राहिलेले सदा सरवणकर आणि उबाठाचे महेश सावंत आहेत. २०१९ मध्ये ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी सहा महिने आधीच तयारी केली होती, कोणी विरोधक जवळपासही पोचणार नाही यांची खातरजमा करून निवडणुकीत उडी घेतली त्या नियोजनाचा अभाव अमित यांच्याबाबतीत दिसून आला. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Satara मध्ये शिवेंद्रराजे आणि अमित कदम यांच्यात लढत; उदयनराजेंच्या पाठिंब्यामुळे शिवेंद्रराजेंचे पारडे जड)

सरवणकर यांचा मतदार

२००४ पासून सदा सरवणकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २००९ मध्ये सरवणकर यांना शिवसेनेने तिकीट नाकारले आणि काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत त्यांनी निवडणूक लढवली आणि हरले, तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची जवळपास ४०,००० मते मिळवली. त्यावेळी मनसेचे नितीन सरदेसाई यांनी ४८,००० मते घेत विजय मिळवला होता. तर शिवसेनेचे (एकसंघ) आदेश बांदेकर यांना ३६,००० मते घेत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. (Assembly Election 2024)

अमित यांच्यापुढे सरवणकर आव्हान

आताही शिवसेना उबाठा तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता असून खरी लढत सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये भाजपाकडून अगोदर अमित ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आणि आता महायुतीचे उमेदवार सरवणकर यांना पाठिंबा देण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्येही पाठिंब्याबाबत संभ्रमावस्था आहे. भाजपाची माहीम भागात जवळपास ३०,००० मते असल्याने भाजपा सरवणकर यांच्यामागे उभी राहिल्यास त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.