Mahim Constituency : सदा सरवणकर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची

123
Mahim Constituency : सदा सरवणकर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्यावतीने महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर हे निवडणूक रिंगणात कायम राहील्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. मात्र, सदा सरवणकर हे विद्यमान आमदार असल्याने या निवडणुकीत त्यांनी मनसेला आणि उबाठा शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केल्याने त्यांना अधिकाधिक मते आपल्या पारड्यात पाडून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे एकप्रकारे ही निवडणूक सदा सरवणकर यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरे, उबाठा शिवसेनेचे महेश सावंत आणि शिवसेनेच्यावतीने विद्यमान आमदार सदा सरवणकर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमित राज ठाकरे यांची निवडणूक सुलभ व्हावी म्हणून दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आपला अर्ज मागे घेणार असे बोलले जात असतानाच दोन्ही उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहत त्यांनी मनसेच्या अमित ठाकरे यांच्या विरोधात आव्हान निर्माण केले आहे. (Mahim Constituency)

(हेही वाचा – विकासद्रोही, राज्यद्रोही, धर्मद्रोही, जनताद्रोही मविआच्या नेत्यांना धडा शिकवा; Pravin Darekar यांचे आवाहन)

सदा सरवणकर हे पूर्वी दादर विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते, त्यानंतर सन २००९मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर माहीम-दादर विधानसभा मतदारसंघातून २०१४ पासून निवडून येत आहे. या भागांमध्ये सदा सरवणकर यांचे प्रस्थ असून काँग्रेसमधून सन २००९मधून निवडणूक लढवतानाही त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली होती आणि तत्कालिन शिवसेनेचे उमेदवार आदेश बांदेकर हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. त्यामुळे दादर, प्रभादेवी भागांमध्ये सदा सरवणकर यांचे प्रस्थ असून आता माहीममध्येही त्यांनी चांगला जम बसवला आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून सरवणकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि भाजपाने त्यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना भेट न दिल्यामुळे सदा सरवणकर हे निवडणूक रिंगणात कायम राहिले. (Mahim Constituency)

(हेही वाचा – Wai मध्ये तिरंगी लढत; महायुतीतील बंडखोरीचा मकरंद पाटलांना बसणार फटका?)

एका बाजूला मनसेचे आव्हान आणि दुसरीकडे शिवसेनेचे आव्हान असल्याने सदा सरवणकर यांच्यासाठी आता अस्तित्वाची लढाई निर्माण झाली. सरवणकर यांना आपल्या दादर माहीम मतदारसंघात मागील दहा वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर किती मतदान आपल्या पारड्यात पाडण्यात ते यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. यापूर्वी एकसंध शिवसेनेच्या मतांवर ते निवडून येत असले तरी शिवसेनेच्या मतांचे विभाजन होत असल्याने सदा सरवणकर यांना आपल्याकडे जास्तीत जास्त मते वळवून घ्यावी लागतील. त्यातच सदा सरवणकर यांच्या धनुष्यबाण चिन्ह असल्याचे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे आजवर या येथील मतदारांना धनुष्यबाण आणि इंजिन चिन्ह सुपरिचित असले तरी उबाठा शिवसेनेचे मशाल चिन्ह हे नविन असल्याने मतदारांचा गोंधळ होऊन खरी लढत ही धनुष्यबाण आणि इंजिन चिन्हांमध्येच होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांना या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार असून या निवडणुकीत जर त्यांचा पराभव झाल्यास त्यांच्या मुलांच्या तिकीटांमध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांना विजयाचा मार्ग पत्करल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे बोलले जात आहे. (Mahim Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.