Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईकरांचे लक्ष माहीम, वरळीकडेच! कुणाचा गड येणार, कुणाचा सिंह जाणार?

405
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा क्षेत्र मोडत असून या जिल्ह्यातील माहीम-दादर, वरळी, भायखळा, वडाळा आणि धारावी या पाच प्रमुख विधानसभा लढतींकडे सर्वांचे लक्ष आहे. माहीम विधानसभेत अमित राज ठाकरे, तर वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्याने ठाकरे बंधूंच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असून दोन्ही ठाकरे जिंकणार की पडणार? की एक जिंकणार आणि एक पडणार, असे प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत Donald Trump आघाडीवर)

वरळी विधानसभेत आदित्यसाठी धोका

वरळी विधानसभेत उबाठा शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक रिंगणात असून आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार असले, तरी या मतदारसंघात देवरा आणि देशपांडे यांनाही मतदारांचा तथा जनतेचा चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे आदित्यसाठी यंदाची निवडणूक तेवढी सोपी राहिलेली नसून पाच वर्षांत विभागात पाट्या टाकणाऱ्या आदित्यकडून निवडणुकीतही पाट्या टाकल्या जात असल्याने मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. याचा परिणाम निवडणूक निकालावरुन दिसून येण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

माहीममध्ये अटीतटीची लढत

माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या वतीने अमित राज ठाकरे, शिवसेनेच्या वतीने सदा सरवणकर आणि उबाठा शिवसेनेच्या वतीने महेश सावंत यांच्यासह एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत तिन्हीही उमेदवार तुल्यबळ आहेत. अमितच्या उमेदवारीवरून मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर उबाठा शिवसेनेला आपला गड परत मिळवून खरी शिवसेना आपलीच आहे, हे दाखवायचे आहे. आपले अस्तित्व कायम राखण्याचे आव्हान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर आहे. त्यामुळे आताची परिस्थिती पाहता तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने निवडणुकीतील प्रत्येक फेरीतील मतांची आकडेवारी ही प्रत्येक पक्षाची धडधड वाढवणारी ठरणारी असेल. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा- Mohammed Shami : नवीन दुखापतीमुळे मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं )

भायखळ्याचा कल महाविकास आघाडीच्या दिशेने

भायखळा विधानसभेत शिवसेनेच्या वतीने यामिनी जाधव, उबाठा शिवसेनेच्या वतीने मनोज जामसुतकर यांच्यातच प्रमुख लढत असून माजी आमदार मधु चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराची डोकेदुखी कमी झाली आहे. परंतु फैयाज अहमद रफीक अहमद खान (एआयएमआयएम ) व सपाचे सईद अहमद खान हे निवडणूक लढत असल्याने मुस्लिम मतांची विभागणी होऊ शकते आणि याचा फटका यामिनी जाधव यांच्याऐवजी जामसुतकर यांना अधिक पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना या मतदारसंघातून ४७ हजार मतांची आघाडी मिळाल्याने, तसेच विभागात सुसंस्कृत, शांत स्वभावाचे आणि लोकांना सतत भेटून त्यांच्या समस्यांचे निराकारण करणारे मनोज जामसुतकर हे निवडणूक रिंगणात उभे असल्याने यामिनी जाधव यांच्यासमोरील आव्हान फार मोठे आहे. लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांना स्वत:च्या मतदारसंघात मिळालेली कमी मते आणि त्यात प्रतिस्पर्धी मजबूत असल्याने या मतदारसंघाचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांना किती प्रमाणात आपल्याकडे वळवण्यात यशवंत जाधव हे यशस्वी ठरतात, यावरच मतांचे गणित आणि विजयाचे समीकरण ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

धारावीत यंदा बदल घडण्याची शक्यता

धारावी विधानसभेत खासदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. या मतदारसंघातून पूर्वी एकनाथ गायकवाड आणि मागील चार वेळा वर्षा गायकवाड या निवडून येत होत्या. परंतु वर्षा गायकवाड या खासदार बनल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी न देता बहिणीला राजकारणात आणून उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे राजेश खंदारे, बसपाचे मनोहर रायबागे, अपक्ष संदीप दत्तू कटके, तसेच अपक्षांसह १२ उमेदवारांचे आव्हान असून शिवसेनेच्या मतांची विभागणी करून ज्योती गायकवाड यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असला, तरी धारावी विकास प्रकल्पाला गायकवाड आणि विरोधकांकडून होत असलेला विरोध मतपेटीतून दिसून येईल, असे बोलले जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा- Sheetal Mhatre: महिलेचा अवमान करणाऱ्या सुनील राऊतची उमेदवारी रद्द करा; शीतल म्हात्रेंचा हल्लाबोल)

वडाळा विधानसभेत कोळंबकरांसमोर जाधवांचे आव्हान

वडाळा विधानसभेत विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर जे १९९० पासून सलग निवडून आलेले आहेत. मुंबईतील सर्वांत जास्त म्हणजे ०८ वेळा निवडून येणाऱ्या भाजपाचे कोळंबकर यांच्या विरोधात शिवसेना उबाठाकडून माजी महापौर श्रध्दा जाधव आणि मनसेकडून स्नेहल जाधव यांचे प्रमुख आव्हान आहे. या तीन प्रमुख उमेदवारांसह रिपब्लिकन सेनेचे मनोज गायकवाड, बसपाचे जलाल मुख्तार खान यांसह अपक्ष असे एकूण ०९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. वयोमानानुसार कोळंबकर यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे बोलले जात असल्याने त्यांना हरवण्यासाठी श्रध्दा जाधव आणि स्नेहल जाधव यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यात या एकेकाळच्या जुन्या मैत्रिणी यशस्वी ठरतात का, याकडे जनतेचे लक्ष आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

सायन कोळीवाडा विधानसभा (१५ उमेदवार)

प्रमुख लढत : गणेश कुमार यादव – काँग्रेस, कॅप्टन आर तमिल सेल्वन -भाजपा, विलास धोंडू कांबळे – बसपा, संजय प्रभाकर भोगले – मनसे, राजगुरू बाळकृष्ण कदम – वंचित बहुजन आघाडी

शिवडी विधानसभा (०७ उमेदवार)

प्रमुख लढत : अजय विनायक चौधरी – शिवसेना (उबाठा), बाळा दगडू नांदगावकर – मनसे , संजय नाना गजानन आंबोले – अपक्ष

मलबार हिल विधानसभा (०८ अंतिम उमेदवार)

प्रमुख लढत : मंगल प्रभात लोढा – भाजपा, भेरुलाल दयालाल चौधरी – शिवसेना (उबाठा)

मुंबादेवी विधानसभा (११ उमेदवार)

प्रमुख लढत : अमीन पटेल – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शायना मनिष चुडासमा मुनोत – शिवसेना

कुलाबा विधानसभा (१३ उमेदवार)

प्रमुख लढत : अॅड. राहुल सुरेश नार्वेकर – भाजपा, हिरा नवाजी देवासी – काँग्रेस

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.