सायबर गुन्हे, Hoax Call रोखण्यासाठी काय आहेत उपाययोजना?

हॉक्स धमकीचे कॉल्स (Hoax Call) रोखण्यासाठी सरकार एक कायदा करण्याचा विचार करत आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रलंबित आहे. संसदेचे अधिवेशन होईल तेव्हा यावरील विधेयक मांडले जाऊ शकते. परंतु त्याची वाट न पाहता सरकारने ताबडतोब आध्यादेश जारी केला पाहिजे.

827
  • प्रवीण दीक्षित 

सायबर गुन्हे हा निश्चितच खूप मोठा विषय आहे. हॉक्स कॉल (Hoax Call) हा गुन्हा वेगळा विषय आहे. हा गुन्हा कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही की कुणाला लुटण्याच्या इराद्याने केलेला नाही. त्यामुळे तो आर्थिक गुन्हा मानला जाऊ शकत नाही. इथे हॉक्स कॉल हा बॉम्बच्या धमकीविषयीचा आहे, जो एक चिंताजनक विषय आहे. सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा आणणारा आहे. संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. विमान वाहतूक मालमत्तेच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे. हे कॉल केवळ विमानांना येत नाही तर एखाद्या शाळा किंवा पंचतारांकित हॉटेललाही येतात. सामान्य सायबर गुन्ह्यांपेक्षा हा सायबर गुन्हा अधिक गंभीर आहे.

हॉक्स कॉल करणाऱ्यांमागे कोणकोणते घटक? 

त्यामागील पॅटर्न काय आहे, यात भारतविरोधी असणाऱ्या घटकांचा समावेश आहे. विशेषतः खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा समावेश आहे. त्याच्याकडे यूएस आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. त्याने 1 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2024 या कालावधीत भारतीय विमानांमध्ये बॉम्बच्या धमकीचे कॉल (Hoax Call) केले. त्याला भारताची अर्थव्यवस्था नष्ट करायची आहे. यात केवळ पन्नू नव्हे तर इतरही काही घटकांचा यात समावेश आहे. दिल्लीतील सीआरपी स्कूलच्या बाहेर स्फोट झाला होता, सर्व सीआरपीएफ शाळा बंद कराव्यात असे जाहीर केले. यातून या घटकांची मानसिकता लक्षात येते.

सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला निर्देश 

सर्व प्रकारच्या आक्षेपार्ह गोष्टी मग त्या पोर्नोग्राफी असो की पेडोफिलिक गोष्टी असो की क्रिप्टोकरन्सी असो की दहशतवादी घटना असो किंवा डार्क नेट असो किंवा ड्रग्ज असो अथवा हॉक्स कॉलच्या (Hoax Call) माध्यमातून धमक्या असो, हे सर्व प्रकार सोशल कॉल्सद्वारे घडवले जातात. दुसरे म्हणजे अशा गुन्ह्यांसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या या व्यक्तींची खाती पाहावीत. त्यांची पडताळणी करावीत. कारण त्यापैकी बहुतेक जण खोटे असतात. हे कोण करते, त्यांचे खरे नाव काय, याची काहीच माहिती नसते. उदाहरणार्थ एक व्यक्ती दोन-तीन व्यक्तीच्या नावे एकाचवेळी 200-300 पेक्षा जास्त ईमेलद्वारे विविध फ्लाइट्सला धमक्या पाठवल्या. त्यामुळे ही संख्या काही वेळात खूप मोठी झाली. म्हणून आता सरकारने सर्व सोशल प्लॅटफॉर्म्सना लेखी निर्देश दिले आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी सर्व सोशल प्लॅटफॉर्म्सने धमक्या येणाऱ्या कॉल्सचे (Hoax Call) तपशील ताबडतोब उघड करणे आवश्यक आहे, जे काही आक्षेपार्ह संदेश येत आहेत ते काढून टाकावेत आणि कोणत्याही असत्यापित व्यक्तीला प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी देऊ नये. विविध देशांनाही याचा सामना करावा लागत आहे.

(हेही वाचा Rashmi Shukla Transfer : निवडणूक आयोगाविरोधात कांगावा करण्याची आता विरोधकांना संधी मिळणार नाही – माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित)

आज भारताला ही परिस्थिती भेडसावत आहे, पण उद्या ही परिस्थिती इतर कोणत्याही देशाला भेडसावू शकते. धमकी येणाऱ्या विमानांतून प्रवास करणारे लोक कदाचित अनेक देशांतील असतील आणि याआधीही अशा घटना घडल्या आहेत, याआधी अशा धमक्या आल्या, परंतु त्यावर ताबडतोब कारवाई झाली नाही. 19 ऑक्टोबर रोजी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ही समिती संबंधित कॉल (Hoax Call) कोणत्या दहशतवादी संघटनेचा आहे का, धमकी देणाऱ्याचा त्यामागील काय हेतू आहे, या सर्व विषयांचे विश्लेषण करून ही धमकी कोठून आली आहे, मग ती विशिष्ट धमकी आहे किंवा हॉक्स कॉल आहे याचे ही समिती विश्लेषण करते.

सायबर गुन्ह्यात लुबाडणूक झाली तर काय कराल? 

तुमची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठीही असे कॉल येतात. तुमचे त्याद्वारे बँक खात्यांचा तपशील मिळवला जातो. म्हणून व्हॉट्सॲपवर कोणताही कॉल किंवा कोणताही व्हिडिओ कॉल (Hoax Call) आला तर तो लगेच अटेंड करू नका, प्रथम ते खरे कॉलर आहेत का किंवा कॉल करणाऱ्याची माहिती विशिष्ट ॲप्सद्वारे सत्यापित करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे कोणीही तुम्हाला डिजिटल पद्धतीने अटक करणार नाही. तसेच आधी 1930 वर संपर्क करा, gov.in ईमेल पत्ता देखील उपलब्ध आहे किंवा पोर्टलही उपलब्ध आहे, त्यावर तक्रार करा. महाराष्ट्रात विशेषतः 14407 नंबरची नवीन विनामूल्य हेल्पलाईन सुरू केली गेली आहे, गेल्या महिन्यात ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे. या गुन्हेगारांना घाबरण्यासाठी कृपया जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा सायबर सेलवर, पोर्टलवर याची तक्रार करा. आता सर्व बँका देखील नियमितपणे जागरुकतेचे संदेश पाठवत आहेत, त्यामुळे तुमची फसवणूक झाली असेल तर कृपया बँकेलाही कळवा.

जर एखाद वेळी तुमच्या खात्यातून पैसे काढले, तर तुम्ही तातडीने बँकेला कळवले तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते, तुमच्या खात्यातून काढलेली रक्कम पुन्हा जमा केली जावू शकते. यासाठी आरबीआय किंवा बँकांकडून किंवा सरकारी संस्थांकडून तुम्हाला मदत होवू शकते. गुंतवणुकीशी संबंधित घोटाळे करणारे लोक तुम्हाला लाखो आणि कोटींची गुंतवणूक करण्यास सांगतात, जेव्हा तुम्ही पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तुम्हाला तुम्ही हे करू शकत नाहीत, असे सांगितले जाते आणि नंतर तुम्ही तुमचे पैसे पूर्णपणे गमावलेले असतात. यात यंत्रणा जरी या लोकांना अटक करू शकली तरीही बहुतेक पैसे हवालाद्वारे हस्तांतरित केलेले असतात किंवा बाहेरील देशांना क्रिप्टोकरन्सीद्वारे पाठवलेले असतात. यात चीन, पाकिस्तान आणि आता उदयोन्मुख आग्नेय आशियाई देश देखील त्यांच्यासाठी स्त्रोत असतात.

सायबर गुन्हेगारीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन 

तरुण भारतीय मुले-मुलींना लाओस किंवा कंबोडिया सारख्या देशांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आकर्षित केले जाते आणि नंतर ते तेथे पोहोचल्यानंतर त्यांना 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी एका विशिष्ट ठिकाणी राहण्यास भाग पाडले जाते. त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात, त्यांना बेकायदेशीर सिमकार्ड दिले जातात, तेथून त्यांना सायबर गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय कॉल करण्यास सांगितले जातात. त्यामाध्यमातून तुम्हाला सीबीआय, पोलिस अधिकारी असल्याचे भासवतात. ही सर्व भारतविरोधी गुन्हेगारांची अत्यंत नियोजित कवायत आहे, त्यामुळे या गोष्टींबाबत आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

हॉक्स कॉल रोखण्यासाठी तातडीने नवा कायदा करण्याची गरज 

विमानांना बॉम्बच्या खोट्या धमक्या देणाऱ्यांच्या विरोधात UAPA कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते. यात जन्मठेपेचीही शिक्षा आणि 10 लाखांचा दंड रुपये होऊ शकतो. अशा गुन्हेगारांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत किंवा आपत्ती अंतर्गत प्रतिबंध व्यवस्थापन कायदा किंवा UAPA  किंवा नागरी विमान वाहतूक नियमांनुसार शिक्षा होते. हॉक्स धमकीचे कॉल्स (Hoax Call) रोखण्यासाठी सरकार एक कायदा करण्याचा विचार करत आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रलंबित आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्यात पुन्हा संसदेचे अधिवेशन होईल त्यानंतर याविषयीचे विधेयक मांडले जाऊ शकते आणि नियमित कायदा येऊ शकतो, परंतु त्याची वाट न पाहता आता वेळ आली आहे. सरकारने ताबडतोब आध्यादेश जारी केला पाहिजे.

आणखी एक महत्त्वाची कल्पना आहे, ज्यावर सरकार विचार करत आहे, कोणताही डेटा लीक होणार नाही, विशेषत: वैयक्तिक डेटा लीक होणार नाही आणि कोणी ते करताना आढळल्यास त्यावर लगेच कारवाई केली जाईल. रशिया, चीनसह इतर अनेक देशानी सोशल मीडियाच्या विरोधात खूप कठोर पावले उचलली आहेत. आपल्याला त्याप्रमाणे कठोर होण्याची गरज नाही. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सद्वारे परिस्थिती नियंत्रित केली जाऊ शकते. या प्लॅटफॉर्ममधील जे अधिकारी भारतात आहेत त्यांनीही वास्तव समजून घेऊन तत्परतेने कृती करावी.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.