- प्रतिनिधी
मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक यांना भाजपाच्या पाठोपाठ आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. आठवले यांनी बुधवारी (६ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवार गट एकाकी पडला आहे. (Assembly Election 2024)
भाजपाचा विरोध डावलून राष्ट्रवादी अजित पवार गटाने मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून मलिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने मलिक यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. येथे महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे बुलेट पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपानंतर आता आठवले गटाने मलिक यांच्या विरोधात भूमिका घेत बुलेट पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना जवळपास स्वबळावर एकहाती निवडणूक लढवावी लागणार आहे. (Assembly Election 2024)
माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, या मतदारसंघात आठवले गटाने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेला पक्षाचा विरोध असल्याने माहीममध्ये आमचा पाठिंबा हा महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांना असल्याचे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. (Assembly Election 2024)
विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे पाच ते सहा जागांची मागणी केली होती. मात्र, जागावाटपात आम्हाला मुंबईतील कालिना आणि धारावी या दोन जागा आल्या. रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडून येणे कठीण असल्याने आमच्या कोट्यातील दोन्ही उमेदवार मित्र पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. पक्षाला मित्र पक्षाकडून उमेदवार देण्यात आले असले तरी कार्यकर्त्यांनी निवडणुकीतनंतर पक्षाला सत्तेत वाटा मिळणार असल्याने नाराज होऊ नये. आपली नाराजी दूर सारून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आठवले यांनी केले. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – शेकडो वर्षे जुन्या कानिफनाथ मंदिरावरही Waqf Board चा दावा)
निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे तसेच विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी पक्षाने महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातच स्थान मिळावे. मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत आम्ही थांबणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी यावेळी दिला. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community