- सचिन धानजी
मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघात सध्या ३१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतलेले असून या जिल्ह्यातील वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम या ८ प्रमुख लढतींकडे सर्वांचे लक्ष आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विनोद शेलार, राम कदम, विद्या ठाकूर, योगेश सागर, पराग अळवणी, मनिषा चौधरी, मिहिर कोटेचा, उबाठा शिवसेनेचे विनोद घोसाळकर, सुनील राऊत, संजय पोतनीस, शिवसेनेचे दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, मनिषा वायकर, संजय निरुपम आदींचे भवितव्य अवलंबून आहे.
वांद्रे पूर्वेत वरूण सरदेसाईंपुढे अडचणी
वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेकडून वरूण सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडू झिशान सिद्दीकी आणि मनसेच्या तृप्ती सावंत यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निकम यांच्या पेक्षा महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांना सुमारे २८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. परंतु महायुतीचे उमेदवार हे झिशान सिद्दीकी असल्याने मुस्लिम मतांचे पारडे महाविकास आघाडीकडून महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे. त्यातच मनसेकडून तृप्ती सावंत आणि शिवसेनेचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे असल्याने हे दोन्ही उमेदवार जेवढी मते मिळवतील तेवढा फटका वरूण सरदेसाई आणि आणि झिशान सिद्दीकी यांना बसवणार आहे. झिशान सिद्दीकी आणि वरूण सरदेसाई यांच्या विजयात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
(हेही वाचा – US Election Results: २७७ बहुमताचा आकडा गाठत Donald Trump ठरले अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष)
वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांसमोर चिंता
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांच्यासमोर काँग्रेसचे आसिफ झकेरिया आणि बसपाचे अजीज कुरेशी आणि अपक्षांसह १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत या वांद्रे पश्चिम मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांच्या जोरावर महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना सुमारे साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आशिष शेलार यांच्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार पिछाडीवर पडल्याने शेलार यांच्यासमोरील चिंता वाढली आहे. आसिफ झकेरिया यांच्या उमेदवारीमुळे शेलार यांच्यासमोर कडवे आव्हान वाढले आहे.
चांदिवलीत पुन्हा मामा उधळणार भगवा गुलाल
चांदिवली विधानसभेतून काँग्रेस आणि हिरवा झेंडा खाली उतरवून शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी पहिल्यांदा या मतदारसंघात भगवा झेंडा फडकवला आहे. या मतदारसंघात शिवसेनेत दिलीप (मामा) लांडे यांच्यासह काँग्रेसचे नसीम खान, मनसेचे महेंद्र भानुशाली आणि एमआयएमचे गफर सय्यद हे निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात ४ लाख ५३ हजार ००३ एवढे मतदार आहे. भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे असले तरी भाजपाचे काही पदाधिकारी नाराज असल्याने त्यांच्यासमोर मनसेचा पर्याय आहे. त्यामुळे लांडे यांच्यासमोर भाजपाचे मतदान शंभर टक्के आपल्याकडे राहील यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. मात्र, मागील निवडणुकीत काठावर पास होणाऱ्या लांडे यांना लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला साडेतीन हजारांची मिळालेली पिछाडी ही विचार करण्यासारखी आहे. त्यामुळे हिरवा विरुद्ध भगवा अशीच लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे.
जोगेश्वरी विधानसभेत वायकरांची प्रतिष्ठा पणाला
जोगेश्वरी विधानसभेतून यंदा रवींद्र वायकर खासदार बनल्याने त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी मनिषा यांना शिवसेनेच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक बाळा नर यांना उबाठा शिवसेनेकडून तसेच मनसेकडून भालचंद्र अंबुरे आणि वंचितचे परमेश्वर रणशूर तसेच अपक्षांसह २२ उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. रवींद्र वायकर यांच्या तालमीतच बाळा नर हे तयार झाले असून एकप्रकारे वायकरांचे कुटुंब सदस्य म्हणूनच नर यांना ओळखले जात होते. परंतु आता नर हेच आता आपल्या वहिनींच्या विरोधात उभे असून लोकसभा निवडणुकीत स्वत: रविंद्र वायकर यांचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे अमोल किर्तीकर यांना स सुमारे ११ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे नर यांच्याबाबतची विभागातील प्रतिमा आणि वायकर यांचे प्रस्थ विचारात घेता वायकरांना आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी आपली सर्व प्रतिष्ठा प्रणाला लावावी लागणार आहे.
(हेही वाचा – Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप)
विक्रोळीकरांना यंदा हवाय बदल
विक्रोळी मतदारसंघात सलग दोन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार तिसऱ्यांदा उबाठा शिवसेनेच्यावतीने सुनील राऊत हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने उबाठा सुवर्णा करंजे, मनसेचे विश्वजित ढोलम, बसपाचे हर्षवर्धन खांडेकर आणि अपक्षांसह १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना सुमारे १६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत हे आपण संजय राऊत यांचे बंधू असल्याने माझा पराभव कुणीच करू शकत नाही, माझ्याशी लढाई करणारा तुल्यबळ उमेदवार दिला नाही अशी प्रतिक्रिया त्यांना माध्यमांसमोर दिली असली तरी विक्रोळीकरांना यंदा बदल हवा आहे. त्यामुळे विक्रोळीकरांसमोर सध्या पर्याय असल्याने ते बदल करतात की विजयाची हॅट्रिक करतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
घाटकोपर पश्चिममध्ये हे राम म्हणण्याची वेळ कुणावर येणार
घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून राम कदम यांचा पत्ता कापला जाणार असे बोलले जात असतानाच भाजपाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. भाजपाचा मतदारसंघ असतानाही उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत सुमारे १६ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे भाजपासाठी हा मतदारसंघ धोक्याचा बनला आहे. यंदा राम कदम यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यासमोर शिवसेनेचे संजय भालेराव, मनसेचे गणेश चुक्कल आणि वंचितचे सागर गवई यांचे आव्हान आहे. परंतु लोकसभा निवडणुकीतील या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास भाजपाच्या राम कदम यांच्यासमोर संजय भालेराव यांचे प्रमुख आव्हान असेल. त्यामुळे यंदा कुणावर हे राम म्हणण्याची वेळ येईल हे आता जनताच ठरवणार आहे.
कलिना विधानसभेत पोतनीस विरुद्ध अमरजितसिंह
संजय पोतनीस (उबाठा शिवसेना), अमरजित अवधनारायण सिंह (भाजपा), बालकृष्ण संदीप हुटगी (मनसे) सुशीला गांगुर्डे (बसपा) आणि अपक्षांसह १६ उमेदवार रिंगणात असून यामध्ये संजय पोतनीस आणि अमरजित सिंह याच्यात प्रमुख लढत आहे.
कुर्ला विधानसभा कुडाळकरांना टक्कर देणार मोरजकर
कुर्ला विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्यातच प्रमुख लढत आहे. या मतदारसंघात मनसेचे प्रदीप वाघमारे, एमआयआयएमच्या आस्मा शेख यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीत खरी लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी असून कुडाळकर यांची हॅट्रिक मोरजकर हे रोखणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विलेपार्ल्यात अळवणी विरुध्द नाईक, शेंडेंचे आव्हान
विलेपार्ला मतदारसंघात भाजपाच्यावतीने तिसऱ्यांदा पराग अळवणी हे निवडणूक रिंगणात उतरले असून या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे संदीप नाईक, मनसेच्या जुईली झेंडे आणि वंचितचे संतोष अमुलगे यांच्यात प्रमुख लढत आहे.
वर्सोव्यात शिवसेनेच्या बंडेखोर राजू पेडणेकर यांचे आव्हान
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेने हारुन खान यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी बंडखोरी करत एकप्रकारे आव्हान निर्माण केले आहे. याशिवाय मनसेचे संदेश देसाई आणि बसपाचे संजय पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गोरेगाव विधानसभेत विद्या ठाकूर विरुद्ध समीर देसाई
गोरेगाव विधानसभेत भाजपाच्यावतीने विद्या ठाकूर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे समीर देसाई, मनसेचे विरेंद्र जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे.
मालाडमध्ये विनोद शेलार यांचे शेख यांच्यासमोर किती आव्हान
मालाडमध्ये काँग्रेसच्या अस्लम शेख याच्या विरोधात भाजपाच्यावतीने विनोद शेलार आणि आणि वंचितचे संजय रोकडे यांचे प्रमुख आव्हान आहे.
चारकोपमध्ये चौरंगी लढत
चारकोपर विधानसभेत भाजपाच्यावतीने योगेश सागर, काँग्रेसच्यावतीने यशवंत सिंह, मनसे दिनेश साळवी आणि वंचित दिलीप लिंगायत यांच्यात प्रमुख लढत आहे.
कांदिवलीत काँग्रेसचे आव्हान किती
कांदिवली विधानसभेतून विद्यमान आमदार अतुल भातखळकर, काँग्रेसचे कालू बुंदेलिया, मनसेचे महेश फरकासे यांच्यात प्रमुख लढत आहे.
दिंडोशीत निरुपम यांचे आव्हान
दिडोंशी विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेच्यावतीने विद्यमान आमदार सुनील प्रभु यांच्यासामोर शिवसेनेचे संजय निरुपम, मनसेचे भास्कर परब आणि वंचितचे राजेंद्र ससाणे यांच्यात प्रमुख आव्हान आहे.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : रामदास आठवलेंचा नवाब मलिकांना विरोध)
बोरीवली विधानसभेत संजय उपाध्याय विरुद्ध संजय भोसले
बोरीवली विधानसभेत यंदा सुनील राणे यांचा पत्ता कापून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्यावतीने संजय भोसले, मनसेचे कुणाल माईणकर यांच्यात प्रमख लढत आहे.
दहिसरमध्ये चौधरी विरुद्ध घोसाळकर
दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्यावतीने मनिषा चौधरी यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे विनोद घोसाळकर, मनसेचे राजेंद्र येरुणकर यांच्या प्रमुख लढत आहे.
मागाठाणेत सुर्वे विरुद्ध पाटेकर
मागाठाणे विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे उदेश पाटेकर, मनसेचे नयन कदम, वंचितचे दिपक हनवते यांच्यात प्रमुख लढत आहे.
मुलुंडमध्ये कोटेचा विरुद्ध शेट्टी
मुलुंड विधानसभा मतदारसंघात मिहिर कोटेचा विरुद्ध काँग्रेसचे राकेश शेट्टी, वंचित प्रदीप शिरसाठ यांच्यात प्रमुख लढत आहे.
भांडुपमध्ये तिरंगी लढत
भांडुप विधानसभा मतदारसंघात विद्यमान उबाठा शिवसेनेचे आमदार रमेश कोरगावकर यांच्याविरोधात शिवसेनेचे अशोक पाटील, मनसेचे शिरीष सावंत, वंचितच्या स्नेहल सोहोनी यांच्यात प्रमुख लढत आहे.
घाटकोपरमध्ये पूर्वमध्ये पराग शाहांच्या विजयाचा मार्ग सुकर
घाटकोपर पूर्व मतदारसंघात भाजपाने पराग शाह यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राखी जाधव, मनसेच्यावतीने संदीप कुलथे, वंचितच्या सुनीता गायकवाड यांच्यात लढत आहे.
मानखुर्द शिवाजीनगरमध्ये नबाव कोण?
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नवबा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीच्यावतीने सपाचे विद्यमान आमदार अबू आझमी हे निवडणूक रिंगणात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे सुरेश (बुलेट) पाटील, मनसेचे जगदीश खांडेकर, वंचितचे मोहम्म्द सिराज शेख याचे आव्हान या प्रमुख उमेदवारासमोर आहे.
(हेही वाचा – US Presidential Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले; भारताविषयीच्या ‘या’ १० मुद्यांचं काय होणार?)
अणुशक्ती नगरमध्ये सना की फहाद
अणुशक्ती नगरमध्ये नबाव मलिक यांची कन्या सना खान या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उभ्या असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) फहाद अहमद यांच्यात प्रमुख लढत आहे. तर मनसेचे नवीन आचार्य हेही निवडणूक रिंगणात आहेत.
चेंबूरचा गड पुन्हा काते मिळवणार ?
चेंबूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर यांना उबाठा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून तुकाराम काते, मनसेकडून माऊली थोरवे आणि वंचितच्या आनंद जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community