लालकृष्ण अडवाणी (L. K. Advani) हे एक भारतीय राजकारणी आहेत. २००२ ते २००४ या सालांदरम्यान त्यांनी भारताचे ७वे उपपंतप्रधान पद भूषवलं होतं. लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपाचे सह-संस्थापक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. १९९८ ते २००४ या सालांदरम्यान त्यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून सेवा केली. याव्यतिरिक्त त्यांनी लोकसभेमध्ये सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं. तसंच लालकृष्ण अडवाणी हे २००९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही होते.
लालकृष्ण अडवाणी (L. K. Advani) यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ साली कराची येथे झाला. भारताच्या फाळणीनंतर ते भारतात स्थलांतरित झाले. भारतात ते मुंबईमध्ये स्थायिक झाले. इथेच त्यांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. १९४१ साली लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सामील झाले. त्यावेळी ते चौदा वर्षांचे होते. त्यांनी राजस्थानमध्ये प्रचारक म्हणून काम केलं. १९५१ साली अडवाणीजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाचे सदस्य बनले. तिथे त्यांनी संसदीय कामकाजाचे प्रभारी, सरचिटणीस आणि दिल्ली युनिटचे अध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर कामं केली. पुढे १९६७ साली ते पहिल्या दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. अडवाणीजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून १९७० पर्यंत काम केलं. त्यानंतर १९७० साली लालकृष्ण अडवाणीजी (L. K. Advani) पहिल्यांदाच राज्यसभेचे सदस्य झाले.
(हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट कोहली किमान २०२७ पर्यंत नक्की खेळेल’)
१९७३ साली अडवाणीजी जनसंघाचे अध्यक्ष झाले. मग पुढे १९७७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जनसंघ हा भारतीय जनता पक्षात विलीन झाला. निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणीजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि राज्यसभेतले सभागृह नेते बनले. अडवाणीजी (L. K. Advani) हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतच भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. लालकृष्ण अडवाणीजींनी तीन वेळा पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. १९८९ साली ते पहिल्यांदा लोकसभेमध्ये निवडून आले होते.
१९९० सालच्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदुत्वाच्या राजकारणाचा उदय झाला. ते २००४ सालापर्यंत गृहमंत्री आणि २००२ ते २००४ सालापर्यंत उपपंतप्रधान होते. त्यांनी २०१९ सालापर्यंत भारताच्या संसदेत काम केलं आहे. तसंच एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भाजपाच्या विकासाचं श्रेय लालकृष्ण अडवाणी (L. K. Advani) यांना देखील जातं. २०१५ साली लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं. तर २०२४ साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community