Assembly Election : ४८ जणांना पक्षाची अधिकृत उमेदवारी; ६१ जणांची अपक्ष म्हणून मैदानात उडी

आमदारकीचे वेध : २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेत २०२४ मध्ये ३० उमेदवार अधिक

108
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
  • प्रतिनिधी

समाजकारणातून राजकारणाकडे वळालेल्या तब्बल १०९ जणांना आमदारकीचे वेध लागले आहेत. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षाचे ४८ उमेदवार असून, अपक्ष म्हणून ६१ जणांनी निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे, २०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ३० उमेदवार अधिक वाढले असून, अपक्षांची संख्याही १६ ने वाढली आहे. सत्तेच्या सारीपाटावर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या गणल्या जातात. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही अधिक महत्त्व राहते. राज्यातील सत्तांतरण, लोकसभा निवडणुकीत बदललेले वारे यामुळे विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा जणू अनेकांनी चंगच बांधला होता. विशेषतः बंडखोरी शमल्याने आणि राजकीय तडजोड झाल्याने अनेकांनी निवडणूक आखाड्यातून माघार घेतली आहे. परंतु, तरीही १०९ उमेदवार पाच जालना विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यात ६१ अपक्षांची संख्या आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण ७९ उमेदवार उभा होते. तर त्यात ४५ अपक्ष होते. त्या निवडणुकीत बहुतांश सर्वच अपक्षांचे डिपॉझिट जप्त झाले असले तरी आमदारकीचे वेध लागल्याने यंदा अपक्षांची संख्या ६१ वर गेली आहे. हे अपक्ष उमेदवार राष्ट्रीयीकृत आणि राज्य मान्यता असलेल्या पक्षांच्या ४८ जणांची डोकेदुखी मात्र वाढविणार आहेत. विशेषतः प्रमुख नेतेही यंदा अपक्ष म्हणून मैदानात असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. त्यामुळे हे अपक्ष आणि इतर उमेदवार किती मते घेणार, यावरच प्रमुख उमेदवारांच्या विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत. (Assembly Election)

राष्ट्रीय पक्षाचे जिल्ह्यात १४ उमेदवार

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाचे १४ उमेदवार असून, राज्य मान्यता प्राप्त पक्षाचे ३४ उमेदवार उभा आहेत. तर अपक्षांची संख्या ६१ आहे. असे एकूण १०९ उमेदवार यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.

(हेही वाचा – PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार)

२०२४ चे उमेदवार अन् अपक्ष
विधानसभा उमेदवार अपक्ष
घनसावंगी २३  १५
जालना  २६ १५
बदनापूर १७  ०८
भोकरदन  ३२ १९
परतूर ११  ०४
एकूण  १०९ ६१
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात पंचरंगी सामना रंगणार

घनसावंगी विधानसभा मतदारसंघांत आगामी विधानसभा निवडणुकीत पंचरंगी सामना रंगणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आमदार राजेश टोपे, महायुतीकडून शिवसेनेचे हिकमत उढाण अपक्ष सतीश घाटगे, माजी आमदार शिवाजी चोथे व वंचितच्या कावेरी बळीराम खटके हे मातब्बर उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला असून, यंदा ते षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. शिवसेनेने जागा वाटपात अखेरपर्यंत जोर लावत ही जागा आपल्याकडे खेचली असून, टोपे यांचे राजकीय विरोधक हिकमत उढाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात टोपे विरुद्ध उढाण अशी लढत आहे. परंतु भाजपाला सोडचिठ्ठी दिलेले सतीश घाटगे आणि उद्धव सेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – FDA कडून भेसळयुक्त अन्न पदार्थांचा २४ लाख रुपयांचा साठा जप्त)

मतदारसंघातील कळीचे मुद्दे

मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेले अंतरवाली सराटी हे गाव घनसावंगी मतदारसंघात येते. त्यामुळे मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा आहे. या मतदारसंघात पूर्वीपासूनच उसाचे गाळप आणि उसाचा दर हे मुद्दे राजकीय पटलावरील प्रमुख विषय राहिले आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवारांसह घाटगे यांचाही कारखाना असून, ऊसही येथे कळीचा मुद्दा राहणार आहे. मतदारसंघातील रस्त्यांसह इतर मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न कायम असून, विरोधकांकडून या मुद्द्यांना हात घालत प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. माजी मंत्री आ. राजेश टोपे गत २५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची, आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची माहिती घेऊन मतदारसंघातील मतदारांसमोर जात आहेत.

जालना विधानसभा मतदारसंघ

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल तर महायुतीचे शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे रिंगणात आहेत. जालन्याची लढत ही गोरंट्याल विरुद्ध खोतकर अशी लढत होणार आहे. उद्योगनगरीमध्ये काट्याची लढत, गोरंट्याल विरुद्ध खोतकर सामना वंचितसह अपक्ष उमेदवारांवरही विधानसभा निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. वंचितचे उमेदवार डेव्हिड घुमारे, काँग्रेसमधील बंडखोर अब्दुल हाफीज अब्दुल गफ्फार आणि भाजपामधील बंडखोर अशोक पांगारकर यांच्यावरही निवडणुकीतील गणिते अवलंबून राहणार आहेत.

जालना विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २९ जणांनी माघार घेतली असून, आता २६ उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत. मविआकडून काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल हे निवडणूक लढवीत असून, महायुतीकडून शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर हे निवडणूक आखाड्यात आहेत. काँग्रेसचे अब्दुल हाफिज यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. तर भाजपाचे महानगर अध्यक्ष अशोक पांगारकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. अब्दुल हाफिज यांच्यामुळे आ. गोरंट्याल यांची, तर पांगारकर यांच्यामुळे खोतकर यांची चिंता वाढणार आहे. त्याशिवाय या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाप्रमुख डेव्हिड घुमारे, बहुजन समाज पार्टीकडून किशोर यादव बोरुडे हेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. जालन्यातील सरळ लढत ही गोरंट्याल विरुद्ध खोतकर अशीच होण्याची चिन्हे आहेत; परंतु या लढतीत यंदा अब्दुल हाफिज, अशोक पांगारकर, डेव्हिड घुमारे हे त्रिकुट प्रचारात किती आघाडी घेणार यावर विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.

मतदारसंघातील महत्त्वाचे कळीचे मुद्दे हे नगरपालिकेची दुरावस्था तसेच उद्योगनगरी मधून बाहेर जात असलेले उद्योग या विषयांसोबतच जातीय समीकरणे आणि मराठा आरक्षण देखील मुद्दा होणार आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Amit Shah म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्रात आणायचे…’)

परतूर मंठा विधानसभा

या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून भाजपाचे बबनराव लोणीकर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे आसाराम बोराडे यांच्यात थेट लढत होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया अपक्ष म्हणूनही निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

विकासाचे अनेक प्रश्न मतदार संघात कायम आहेत, त्यातील काही प्रश्न सोडवण्यात विद्यमान आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना यश आले असले तरी अद्याप आरोग्य, पाणी, सिंचन, आणि औद्योगिकरणाच्या बाबतीत मागासलेपणा कायम आहे.

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ

या जागेसाठी महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार संतोष दानवे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होणार आहे. परतूर मंठा विधानसभा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उबाठाचे रमेश गव्हाड, डॉ. कृष्णा कोरडे, माजी सभापती लक्ष्मणराव दळवी यांच्यासह २० उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामध्ये महायुतीचे आमदार संतोष दानवे, महविकास आघाडीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, वंचित बहुजन समाज पक्षाचे राहुल छडीदार, वंचित बहुजन आघाडीचे दिपक बोऱ्हाडे, अपक्ष म्हणून केशव जंजाळ, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या अंजली भुमे, भारतीय ट्रायबल पार्टीचे गजानन बरडे, स्वाभिमानी पक्षाचे मयूर बोर्डे, महाराष्ट्र स्वराज पार्टीचे विकास जाधव, हिंदुस्थान जनता पार्टीचे साहेबराव पंडित, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे फकिरा शिरसाठ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुनिल इंगळे, विदुथलाई चिरूथईगल काटचीचे सुनिल वाकेकर, अकबर अली अक्रम अली खान, कडुबा इंगळे, अपक्ष, केशव देठे, कैलास पाचंगे, गणेश साबळे, चंद्रशेखर दानवे, जगदीश राऊत, जगन लोखंडे, दिवाकर गायकवाड, नासेर शेख, निलेश लाठे, महादू सुरडकर, यासीन मदार, रफिक शेख, योगेश शिंदे, रवी हिवाळे, वैशाली दाभाडे, शिवाजी भिसे असे ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे. (Assembly Election)

बदनापूर विधानसभा मतदारसंघ

महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार नारायण कुचे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बबलू चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर नारायण कुचे विरुद्ध बबलू चौधरी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. राखीव असलेल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार नशीब अजमावत आहेत. त्यांतही भाजपाचे आ. कुचे हे हॅटट्रिक साधण्यासाठी धडपड करीत असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रूपकुमार चौधरी चौथ्या वेळी लढत असलेल्या निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. बदनापूर विधानसभा मतदारसंघात नारायण कुचे यांनी २०१४, २०१९ मध्ये विजय मिळविला होता. तर या दोन्ही निवडणुकांत बबलू चौधरी यांचा पराभव झाला होता. या मतदारसंघात केवळ शिवसेनेचे माजी आमदार नारायणराव चव्हाण यांनी सलग तीन वेळा विजय मिळवून हॅटट्रिक साधली होती. आता. आ. कुचे हॅटट्रिकच्या प्रयत्नात आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून निवडणूक लढविलेल्या बबलू चौधरी यांचा शिवसेनेचे संतोष सांबरे यांनी पराभव केला होता. चार निवडणुकांमध्ये चौधरी यांचे प्रत्येक वेळी मताधिक्य वाढले असले तरी त्यांना विजय मिळालेला नाही. त्यामुळे पराभवाच्या हॅटट्रिकनंतर चौथ्या वेळी विजय कसा मिळविता येईल, याची गणिते बांधत चौधरी आणि समर्थक प्रचार करीत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.