‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तावर मोदींचे शिक्कामोर्तब! राणे बनले केंद्रीय मंत्री!

२०१९ च्या विधानसभा निवडणुकी अगोदर नारायण राणे भाजपवासी झाले आणि त्यांना भाजपने राज्यसभेवर देखील पाठवले.

131

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा विस्तार बहुप्रतिक्षेनंतर बुधवार, ७ जुलै रोजी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात येईल, असे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने सर्वात आधी दिले होते. त्या वृत्ताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

२०१९ची लोकसभा निवडणूक भाजप-सेनेने एकत्र लढवली होती, त्यानंतर विधानसभाही लढवली, मात्र निकालानंतर सेनेने राजकीय समीकरणे बदलली. भाजपाला बाजूला ठेवून दोन्ही काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिवसेना एनडीएमधूनही बाहेर पडली, साहजिकच शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे मोदी सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री होते, त्यांनाही मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज मंत्री मंडळाच्या विस्तारात पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेने कट्टर विरोधक नारायण राणे यांना मंत्रिपद देऊन सेनेला डिवचले आहे. जेव्हा शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आणि अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ‘हिंदुस्थान पोस्ट’नेच सर्वात आधी मोदी सरकार सेनेला डिवचण्यासाठी राणेंना मंत्रिपद देऊन महाराष्ट्रात सेनेला शह देईल, अशा आशयाचे वृत्त ‘मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान?’ या मथळ्याखाली दिले होते. त्या वृत्ताला पंतप्रधान मोदी यांनी शिक्कामोर्तब केले.

(हेही वाचा : अमित शहांचे मिशन कोकण, लक्ष मात्र महाराष्ट्र मिशन!)

राणेंची राजकीय ‘कारकिर्द’!

शिवसेनेचे शाखाप्रमुख झालेले राणे नंतर नगरसेवक झाले. त्यानंतर बेस्टचे अध्यक्ष असा राणेंचा राजकीय दबदबा वाढतच होता. १९९१ साली भुजबळांनी सेना सोडली आणि विधीमंडळातल्या विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरात शिवसेना-भाजप युती सरकारात राणे महसूल मंत्री झाले. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, २००५ मध्ये नारायण राणेंनी काही आमदारांसोबत शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. राणेंना काँग्रेसमध्ये महसूल मंत्रिपद मिळाले. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खाते मिळाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकी अगोदर नारायण राणे भाजपवासी झाले आणि त्यांना भाजपने राज्यसभेवर देखील पाठवले.

राज्यातील कोण खासदार आहेत ज्यांना मिळाले मंत्रिपद? 

खासदार कपिल पाटील – भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, त्यांची ही दुसरी टर्म आहे. भिवंडी येथील ते लोकसभेचे खासदार आहेत. मागील ३ दशके ते सक्रिय राजकारणात आहेत. दिवे-अंजूर ग्रामपंचायतचे सरपंच पदापासून ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे. लवकरच मुंबईच्या आजूबाजूला ठाणे, नवी मुंबई या महापालिकांच्या निवडणुका येत आहेत. ठाण्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांना दिलेले मंत्रिपद महत्वाचे वाटत आहे.

भागवत कराड – भाजपचे राज्यसभेचे ते खासदार आहेत. त्यांची ही पहिली टर्म आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात औरंगाबाद महापालिकेचे महापौर पद भूषवले होते. पेशाने डॉक्टर असलेले कराड यांचे कराड येथे मोठे रुग्णालय आहे. मराठवाड्यात ओबीसी नवा चेहरा, नवे नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न भाजपचा या मागील आहे. कराड यांच्यामाध्यातून मराठवाड्यात भाजपने ओबीसी चेहरा दिला आहे.

भारती पवार – दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या त्या खासदार आहेत. त्यांची हे पहिली टर्म असूनही त्यांना मंत्रिपद दिले आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या त्या सदस्या होत्या. खान्देशात आदिवासी चेहरा देऊन भाजपने नवे राजकीय समीकरण खान्देशात मांडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.