महायुतीने महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत महिना १५०० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यावर कालपर्यंत महायुतीवर या योजनेवरून टीका करणाऱ्या मविआने मात्र निवडणुकीच्या जाहीरनाम्यात चक्क महायुतीचीच योजना चोरून ‘महालक्ष्मी’ योजनेच्या अंतर्गत महिना ३००० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. यामुळे आता महायुतीचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मविआचे हे आश्वासन किती आश्वासक आहे कि नुसताच फोलपणा आहे, हे सांगताना चक्क हिशेबच मांडला.
एका डिजिटल वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी अर्थमंत्री म्हणून दहावेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. आम्ही २ लाख ३० हजार महिलांना पैसे दिले आहे. महिना प्रत्येकी १५०० रुपयांवरून वर्षाला १८ हजार रुपये असे करून अडीच लाख महिलांना ४५ हजार कोटी १५०० रुपये द्यावे लागतात. आता विरोधकांनी प्रत्येक महिलेला महिना ३ हजार रुपये जाहीर केले, म्हणजे वर्षाला १ लाख कोटी खर्च होणार. आमचा हिशोब ४५ हजार कोटीचा होतो, आम्ही जाहीर केले तेव्हा विरोधक आम्हाला विरोध करताना ‘पैसे कुठून आणणार? तिजोरीत पैसे कुठून येणार?, असे ओरडत होते.
विरोधक लाखो कोटी कुठून आणणार?
आपले बजेट साडे सहा लाख कोटींचे आहे. पुढच्यावेळी सात लाख कोटींचे होईल. पुढच्यावेळी बजेट जसे वाढेल, तसे २१ वर्षांच्या महिलाही या योजनेत वाढणार आहेत, त्यामानाने ६५ वर्षाच्या कमी महिला रिटायर्ड होतात. आता काहीजण बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देणार आहेत असे सांगत आहेत. आता त्यात परत काही लाख कोटींची भर पडेल, म्हणजे बजेट ७ लाख कोटींचे असले तर त्यामध्ये सगळ्यांचे पगार, पेन्शन, घेतलेल्या कर्जाचे व्याज यालाच जातात साडे तीन लाख कोटी रुपये. राहीलेल्या साडे तीन लाख कोटी रुपयामध्ये डेव्हलपमेंट आहे. यामध्ये आता घोषणांचा पाऊस सुरू आहे, ब्रम्हदेव आला तरी या घोषणा पूर्ण होणार नाहीत. सगळ्यांना एसटी फुकट, कशाचा कशालाच मेळ नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. आम्ही सुरु केलेली योजना आहे त्याला ४५ हजार कोटी रुपये लागत होते. १५ हजार कोटी वीजेसाठी लागत होते. आम्ही आमच्या सगळ्या योजनांचा हिशेब केला तेव्हा बजेट ८० हजार कोटींच्या पुढे जात होते. आता विरोधकांनी या सगळ्या योजना दुप्पट केल्या आहेत. याचा हिशोब दोन, तीन लाख कोटी रुपयांवर जाईल. हे विरोधक लोकांची फसवणूक करत आहेत, त्यामुळे विरोधकांनी आता एवढे लाखो कोटी रुपये कसे उपलब्ध करणार आहे हे सांगावे, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community